सिंधुदुर्ग : थरारक पाठलाग करून दारू वाहतुक करणारी कार पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 06:09 PM2018-12-11T18:09:38+5:302018-12-11T18:33:35+5:30
ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूला आळा बसावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क सज्ज झाले आहे.
सिंधुदुर्गनगरी : ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूला आळा बसावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क सज्ज झाले आहे.
सोमवारी रात्री ११:३० वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस येथील भरारी पथकाने आंबोली येथून थरारक पाठलाग करत विलवडे हायस्कूल (ता. सावंतवाडी) येथे गोवा बनावटीची वाहतूक करणाऱ्या कारवर केलेल्या कारवाईत २ लाख ८० हजार ८०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारुसह ६ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी कार चालक अनंत अरुण मिस्त्री (२६ रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ख्रिसमस व ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूकीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्या आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस येथील भरारी पथकाला आंबोली मार्गे जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या भरारी पथकाने अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी सोमवारी रात्री आंबोली येथे सापळा रचला होता. रात्री ११:३० च्या सुमारास गोव्याहून आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या कार (एमएच ०७ एच १९१७) या कारला थांबण्याच्या ईशारा करण्यात आला. मात्र ही कार न थांबता सावंतवाडीच्या दिशेने वेगाने निघून गेली.
६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने या कारचा थरारक पाठलाग करत विलवडे हायस्कूल सावंतवाडी येथे ही कार थांबवून तपासली असता आत २ लाख ८० हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारु आढळून आली. त्यामुळे गोवा बनावटीची अवैध दारू व कार असा एकूण ६ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच गोवा बनावटीची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी कार चालक अनंत अरुण मिस्त्री या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली जवान शिवशंकर मुपडे, रमाकांत ठाकुर, चालक आदींनी केली आहे.