सापासोबतची मस्ती पडली महागात, आधी खेळ करायला गेला अन् नंतर झाला खेळखंडोबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 01:16 PM2022-01-12T13:16:34+5:302022-01-12T13:27:12+5:30
व्हिडिओमध्ये एक तरुण सापाला हातात पकडून सापाच्या तोंडावर फुंकताना दिसतो. यानंतर साप जे काही करतो, जे पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
सापाचं (Snake) नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. या जीवाने एखाद्याला चावा घेतल्यास यात अनेकांचा मृत्यूही होतो. याच कारणामुळे माणसांसोबतच अनेक प्राणीही या जीवापासून दूर राहाणंच योग्य समजतात. सध्या सोशल मीडियावरसापाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Shocking Video of Snake) होत आहे . यात एका तरुणाला सापासोबत पंगा घेणं चांगलंच महागात पडल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये एक तरुण सापाला हातात पकडून सापाच्या तोंडावर फुंकताना दिसतो. यानंतर साप जे काही करतो, जे पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल (Snake Attacks on a Boy).
सोशल मीडियावर सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स मिळावे, यासाठी लोक स्वतःचा जीवही धोक्यात घालायला तयार असतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओही असाच आहे. हा व्हिडिओ एखाद्या फॅक्ट्रीमध्ये शूट केला गेला असल्याचं जाणवतं. यात एका तरुणाच्या हातामध्ये साप असल्याचं दिसतं. हा साप अतिशय लांब आणि धोकादायक दिसत आहे. मात्र, तरुण न घाबरता या सापाच्या तोंडावर फुंकताना दिसतो. यामुळे साप भडकतो. मात्र तरुणाने त्याला घट्ट पकडलेलं असतं. त्यामुळे साप काहीच करू शकत नाही.
काही वेळातच हा तरुण सापाला आपल्या डोक्याजवळ घेऊन जातो. यानंतर लगेचच साप या तरुणाला चावतो. हैराण करणारी बाब म्हणजे, बराच वेळ हा साप तरुणाच्या डोक्याला चावा घेत राहातो आणि प्रयत्न करूनही साप त्याला सोडायला तयार नसतो. हे दृश्य खरोखरच भीतीदायक आहे. हैराण करणारा हा व्हिडिओ ट्विटरवर @Folico_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 6 डिसेंबरला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत २४ हजारहून अधिकांनी पाहिला आहे.
— Prófugos del Ácido (@Folico_) December 6, 2021
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तरुणाला सल्ला देत सांगितलं, की साप ही खेळण्याची वस्तू नाही. अनेकांनी या तरुणाचं कृत्य अतिशय चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. काहींनी तर या सापाचंच कौतुक केलं आहे. लोकांचं म्हणणं आहे, की अशा वेड्या लोकांना अशी अद्दल घडायला हवी. काही यूजर्सनी या तरुणाबद्दल काळजीही व्यक्त केली आहे.