शेअर, लाइक्स अन् फेम... 'रुको जरा सब्र करो...!'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 01:49 PM2022-02-07T13:49:10+5:302022-02-07T14:00:48+5:30
काही अतरंगी, शिवीगाळ करणारे, भडक आणि भोचक...तर काही गंभीर वाटेने जाऊनही युझर्सच्या मनावर राज्य करणारे! सोशल मीडियात चलती असलेल्या या इन्फ्युएन्सर्स कहाण्या म्हणजे खदखदत्या भातातली काही शितं...
मोरेश्वर येरम-
(सीनिअर कंटेंन्ट एक्झिक्युटिव्ह)
moreshwar.yeram@lokmat.com
काही अतरंगी, शिवीगाळ करणारे, भडक आणि भोचक...तर काही गंभीर वाटेने जाऊनही युझर्सच्या मनावर राज्य करणारे! सोशल मीडियात चलती असलेल्या या इन्फ्युएन्सर्स कहाण्या म्हणजे खदखदत्या भातातली काही शितं...
विकास पाठक उर्फ 'हिंदुस्थानी भाऊ'
भारत-पाकिस्तान मुद्द्यावर पाकिस्तानबाबत शिव्यांची लाखोली आणि अश्लील भाषेचा वापर करणारा विकास पाठक उर्फ 'हिंदुस्थानी भाऊ' याचे इन्स्टाग्रामवर १५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. पाकिस्तानच्या विषयावर नेहमी शिवीगाळ करत बोलण्याचा 'हिंदुस्थानी भाऊ'चा अंदाज नेटिझन्सना आवडला हे विशेष. याच 'व्हायरॅलिटी'मुळे 'हिंदुस्थानी भाऊ' रिआलिटी शो 'बिग बॉस'मध्येही पोहोचला होता. विद्यार्थ्यांची माथी भडकवून कोरोना काळात हजारोंच्या संख्येनं गर्दी केल्याप्रकरणी 'हिंदुस्थानी भाऊ' सध्या पोलीस कोठडीत आहे.
'थेरगाव क्विन'
लेडी डॉन 'थेरगाव क्विन' नावाने सोशल मीडियात व्हायरल झालेली १८ वर्षीय साक्षी हेमंत श्रीमल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिवीगाळ करून व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी तिला आधी अटक करण्यात आली आहे. साक्षी तिच्या साथीदारांच्या मदतीने इन्स्टाग्रामवर अश्लील भाषेत धमकीचे अनेक व्हिडिओ पोस्ट करत होती. तिच्या व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज आणि कमेंट्सही आहेत. इन्स्टाग्रामवर 'थेरगाव क्विन'चे ४१ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
लंगुटे अण्णा
सोशल मीडियात जशी तरुणाईची चलती आहे. तसेच वयोवृद्धही आता मागे राहिलेले नाहीत. इन्स्टाग्रामवर लाइक्स आणि फॉलोअर्सच्या मोहापायी वयोवृद्धांचा वापर करून व्हिडिओ व्हायरल करण्याचेही प्रमाण वाढले आहे. लंगुटे अण्णा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटची सध्या खूप चलती आहे. लंगुटे अण्णा म्हणजे एक आजोबा. ज्यांना स्टायलिश गॉगल लावलेला असतो आणि धारधार, दिलखेचक डायलॉग त्यांना बोलायला सांगितले जाते. डॉयलॉगच्या शेवटी एक शिवी हासडायची असा रोजचा या आजोबांचा इन्स्टाग्रामवर शिरस्ता सुरू आहे. लंगुटे अण्णा यांचे इन्स्टाग्रामवर तब्बल १ लाख ४४ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
'गुलीगत' सुरज चव्हाण
'टिकटॉक स्टार' सुरज चव्हाणचे आज इन्स्टाग्रामवर पाच लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मूळचा बारामतीचा असलेला सुरज चव्हाण अशिक्षीत असून टिकटॉकवर त्याने केलेले व्हिडिओ गाजले आणि रातोरात स्टार झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याची ओळख निर्माण झाली. एखाद्या सलूनचे उद्घाटन असो किंवा मग स्थानिक क्रिकेट सामन्यांचा कार्यक्रम असो गुलीगत फेम सुरज चव्हाणला एखाद्या सेलिब्रिटीसारखे निमंत्रित केले जात होते. त्याचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या गावातील इतर काही मुलांसोबत त्याचे वाद झाले आणि त्याला मारहाण झाल्याचे एक प्रकरण नुकतेच समोर आले होते.
ढिंच्याक पुजा
'दिलों का शूटर..हाय मेरा स्कूटर' या एका रॅप साँगमुळे दिल्लीची 'टिकटॉक स्टार' ढिंच्याक पुजा रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली होती. ना सूर, ना ताल किंवा कोणतेही संगीताचे शिक्षण नसलेल्या पुजाचे 'दिलों का शूटर' गाणे प्रचंड व्हायरल झाले होते. पण या व्हिडिओत तिने विनाहेल्मेट स्कूटर चालवली होती आणि दिल्ली पोलिसांकडून कारवाई केल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. 'ढिंच्याक पुजा' हिचे इन्स्टाग्रामवर दोन लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
प्राजक्ता कोळी
'मोस्टलीसेन' या नावाने लोकप्रियता प्राप्त झालेली व्हिडिओ क्रिएटर, यूट्यूबर प्राजक्ता कोळी तिच्या कामासाठी नेहमीच चर्चेत असते. विविध विषयांवर साध्या-सुलभ आणि सर्वांना समजतील अशा भाषेत फॅक्ट्स प्राजक्ता तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन सांगत असते. अभिमानाची गोष्ट अशी की प्राजक्ताला गुगलची चॅरिटी संस्था असलेल्या गुगल ऑर्गने मोठी संधी दिली आहे. इम्पॅक्ट चॅलेंज या त्यांच्या प्रकल्पात प्राजक्ता जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या प्रकल्पात जगभरातील अनेक मोठी नावे जसे शकिरा, नोबेल विजेत्या रिगोबार्टा मेनचू तुम, नाओमी ओसाका हे काम करणार आहेत. प्राजक्ता कोळीचे इन्स्टाग्रामवर ४७ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Be YouNick
डोंबिलवलीच्या एका तरूणाने सुरू केलेले Be YouNick चॅनल आजचे सर्वात झक्कास चॅनल मानले जाते. 'बी यू निक'चे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतात. तरूणाईमध्ये तर यांच्या यूनिक स्टाईलची कमालीची क्रेझ बघायला मिळते. निकुंज लोटिया नावाच्या तरुणाचे हे चॅनल आज तरुणाई आवर्जुन पाहते ते त्याच्यातील हजरजबाबीपणा, तरुणाईला खिळवून ठेवेल आणि त्यांचे मन जिंकेल अशा जबरदस्त व्हिडिओंमुळे. 'मौका मौका' या जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर निकुंजने हटके व्हिडिओ केला होता आणि तो तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर 'बी यू निक'च्या अविरत प्रवासाला सुरूवात झाली ती आजही सुरू आहे.
abhiandniyu (अभि अँड नियू)
अभिराज राजाध्यक्ष आणि नियती मविनाकुर्वे या यंग कपलने ज्वलंत विषयांवर माहितीपूर्ण पण तितकेच सहज-सोपे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आणि नेटिझन्सनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला. विषय कितीही गंभीर असला तरी त्यावर अगदी काही मिनिटांत तेही खिळवून ठेवणारे पण तितकेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ तरुणाईला भावतील अशा फॉरमॅटमध्ये अभि अँड नियू पोहोचवत असतात. अभि अँड नियूचे इन्स्टाग्रामवर २२ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
प्रगत लोके
अतिशय मधाळ आणि लोकांना आपलसं वाटणाऱ्या भाषेत बोलणारा प्रगत लोके फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय आहे. Daily Volg च्या माध्यमातून प्रगत रोज आपल्या प्रेक्षकांना तो दिवसभर काय करणार आहे त्याचे अपडेट्स देत असतो. नेटिझन्सना आता प्रगतच्या Daily Volg ची इतकी सवय झाली आहे की एखादा दिवस त्याने व्हिडिओ केला नाही तर प्रेक्षकांच्या कमेंट्सचा पाऊस सुरू होतो. प्रगत लोके याचे फेसबुकवर तीन लाखाहून अधिक तर इन्स्टाग्रामवर ३४ हजार फॉलोअर्स आहेत.
आरजे सोहम
तरुणाईला भावतील अशा ट्रेडिंग विषयांवर आपल्या हटके विनोद शैलीतून भाष्य करणारा आरजे सोहम नेटिझन्सच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मराठी मालिकांमधील मेलोड्रामा, इंग्रजी बोलण्याचा आव आणणारे, आयपीएल, मिसळ अशा विविध विषयांवर आरजे सोहम त्याच्या अनोख्या शैलीत भाष्य करतो. पाकिस्तान आणि आयपीएलवर आरजे सोहमने केलेला व्हिडिओ जबरदस्त गाजला होता. आरजे सोहम यांचे इन्स्टाग्रामवर दोन लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.