चर्चेतले सोशल व्हायरल; रिक्षा, ट्रॅफिक अन् जगाचा नकाशा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 05:27 AM2022-12-07T05:27:24+5:302022-12-07T05:27:39+5:30
गुजरातमधील ३५ जिल्ह्यांची यादी, उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांची यादी असे सारे काही त्याने क्रिशला बोलून दाखविले.
मुंबई : क्रिश राजीव या नेटिझनने संध्याकाळी पश्चिम उपनगरात जाण्यासाठी रिक्षा पकडली आणि पुढे त्याला भरपूर ट्रॅफिक लागला. जिथे जायचे होते त्या जागेवर पोहोचण्यासाठी त्याने गुगल मॅप तपासला तर ते अंतर तीन किलोमीटर इतकेच होते. पण वाहतूक कोंडीमुळे त्याला तिथे पोहोचण्यासाठी एक तास लागेल, असे मॅपने दाखविले. पण त्याचवेळी तो ज्या रिक्षातून जात होता त्या रिक्षावाल्याने त्याचा वैताग ओळखला आणि त्याच्याशी गप्पा सुरू केल्या. रिक्षावाल्याचे नाव रामदेव असे होते.
रामदेव यांनी विचारले की, साहेब तुम्ही किती देश फिरला आहात...त्याच्या प्रश्नाने क्रिशला हसायला आले. रामदेव म्हणाला की, साहेब मला युरोप खंडातल्या ४४ देशांची नावे पाठ आहेत अन् लगेच त्याने त्या देशांच्या आद्याक्षरानुसार त्याने ४४ देशांची यादीच क्रिशला बोलून दाखविली. त्यापाठोपाठ या सर्व देशांच्या प्रमुखांची नावे देखील सांगितली. त्यानंतर गुजरातमधील ३५ जिल्ह्यांची यादी, उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांची यादी असे सारे काही त्याने क्रिशला बोलून दाखविले. हे सारे सुरू असताना कधी तो तीन किलोमीटरचा प्रवास संपला हे क्रिशला जाणवलेच नाही. पण एवढीच नाही तर रामदेव यांच्याकडे अशी भरपूर माहिती आहे.