पुराच्या पाण्यात घर गेले अन् पुस्तकही; ढसाढसा रडणाऱ्या मुलीला सोनू सूद म्हणाला, ताई अश्रू पूस! आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 09:02 PM2020-08-19T21:02:15+5:302020-08-19T21:03:15+5:30
छत्तीसगडमध्ये पुराच्या पाण्यात घर कोसळलं तर पुस्तकही खराब झाली, अभिनेता सोनू सूद मदतीला धावला
बीजापूर – कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु झालं. तेव्हापासून आतापर्यंत अभिनेता सोनू सूद याने लोकांना केलेल्या मदतीचे अनेक किस्से सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. लॉकडाऊनच नव्हे तर आता बिहार, उत्तरप्रदेश, छत्तीसगड याठिकाणी आलेल्या नैसर्गिक संकटातील लोकांच्या मदतीसाठी सोनू सूद धावला आहे.
छत्तीसगड येथील आदिवासी मुलीचं अश्रू पुसण्याचं काम अभिनेता सोनू सूदने केले आहे. राज्यातील बीजापूर जिल्ह्यातील छोट्या गावात राहणाऱ्या अंजली कुडियमच्या मदतीला सोनू सूद पुढे सरसावला आहे. गेल्या १५-१६ ऑगस्टला रात्री आलेल्या पावसामुळे अंजलीच्या गावात पूराचं पाणी आलं. गावकरी, नातेवाईक यांच्या मदतीनं अंजली आणि कुटुंबीयांनी मध्यरात्री ३.३० च्या सुमारास गाव सोडून ५ किमी दूर एका गावामध्ये आश्रय घेतला.
मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अंजली, तिचे वडील सोमल कुडियम, आजी, आत्या आणि भाऊ यांच्यासोबत सुरक्षितस्थळी पोहचली. परंतु ज्यावेळी पाणी ओसरलं तेव्हा ती पुन्हा गावातील तिच्या घराकडे परतली. त्याठिकाणी घर पूर्णपणे कोसळलं होतं, सामान अस्तव्यस्त पडलं होतं. यावेळी अंजलीची नजर तिच्या पुस्तकांवर गेली तेव्हा तिच्या संयमाचा बांध फुटला आणि अश्रू अनावर झाले. ती जोरजोरात रडू लागली. या घटनेचा व्हिडीओ एकाने ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोनू सूदपर्यंत पोहचला.
यानंतर तातडीने सोनू सूदने हा व्हिडीओ शेअर करत ताई, तुझे अश्रू पुसून टाक, पुस्तकंही नवीन असतील अन् घरही नवीन बांधू असं सांगत सोनू सूदच्या टीमने अंजलीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
आंसू पोंछ ले बहन...
— sonu sood (@SonuSood) August 19, 2020
किताबें भी नयीं होंगी..
घर भी नया होगा। https://t.co/crLh48yCLr
हे पहिल्यांदाच नाही तर यापूर्वी सोनू सूदने अनेकांना मदत केल्याची उदाहरणे आहेत. सोनू सूदने गेल्या काही महिन्यांपासून हजारो प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन काळात मुंबईतून परराज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं काम अजूनही सुरूच आहे. त्यातच, आता प्रवाशी मजूरांना त्यांच्या गावात रोजगारही सोनूच मिळवून देणार आहे. प्रवासी मजूरांच्या मदतीपासून सुरू झालेलं त्याचं काम दिवसेंदिवस वाढतच आहे. सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत, वृद्ध आजीबाईंना ऑफरच देऊ केली होती. महिलांना स्व-संरक्षणाची ट्रेनिंग देण्याचा विचार सोनूने केला होता. त्यानंतर निर्मिती परिवारातील सदस्यांनी #Warrior_aaji यांची भेट घेतली. शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे क्लास सुरू करण्याचे स्वप्न "निर्मिती फाऊंडेशन" येणाऱ्या बावीस ऑगस्टला सत्यात उतरवत आहे. सोनू सूद यांची मोलाची मदत मिळाली असून लवकरच आजीचे हक्काचे व्यासपीठ त्यांना मिळणार आहे, अशी माहिती निर्मित्ती फाऊंडेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली होती.