अतिशहाणपणा नडला! खिडकीतून ST मध्ये चढण्यासाठी तरुणाची धडपड; चौकटीसह आला खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 03:53 PM2024-07-23T15:53:45+5:302024-07-23T16:05:26+5:30
सध्याच्या घडीला सोशल मीडियावर एका विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.
Social Viral : महाराष्टाची जीवनवाहिनी म्हणजे लालपरी. लाल डब्बा, एसटी तसेच लालपरी अशा नानाविध नावांनी ती ओळखली जाते. गावागावातून, खेड्यापाड्यातून गेली कित्येक वर्षे तिचा प्रवास चालू आहे. लालपरीचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाल परवडणारा असल्यामुळे ग्रामीण भागात लोकांची सर्वाधिक पसंती एसटीला मिळते. वाढत्या लोकसंख्येमुळे गावाकडेही आता एसटीची सेवा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची एकच झुंबड पाहायला मिळते. एसटीमध्ये बसायला जागा मिळावी यासाठी लोकांची मोठी धडपड सुरू असते. केवळ सीटसाठी प्रवाशांची मोठी तारेवरची कसरत चालू असते. सध्या सोशल मीडियावर याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.
प्रवाश्याला धडा मिळाला म्हणून खुश व्हावं की एसटीची काच पडली म्हणून दुःखी ! 🤣🤪 pic.twitter.com/YuRzF8UNMc
— Rohit Dhende (@avaliyapravasi) July 22, 2024
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक विद्यार्थ्यी एसटीमध्ये बसायला सीट मिळावी यासाठी आपले शर्थीचे प्रयत्न करताना दिसतो आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली असल्यामुळे दरवाज्यातून आपल्याला जाता येणार नाही, यासाठी सीट पकडण्यासाठी त्याने ही अनोखी युक्ती केली. खिडकीतून एसटीमध्ये घुसण्याचा त्याचा हा प्रयत्न फसला आहे. खिडकीच्या साहाय्याने एसटीमध्ये तो विद्यार्थी चढण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या वजनामुळे तो खिडकीच्या चौकटीसह जमिनीवर धाडकन कोसळतो. त्याच एसटी स्टॅंडवर असलेल्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. सदर व्हिडीओ हा महाराष्ट्रातील बीड येथील असल्याचा सांगण्यात येत आहे.
Rohit Dhende @avaliyapravasi या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर प्रवाशाला धडा मिळावा म्हणून खुश व्हावं की एसटीची काच पडली म्हणून दु:खी असं कॅप्शन यूजरने दिलं आहे.
नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने "असे काही आगाऊ विद्यार्थी असतातच सगळीकडे..आशा आहे अद्दल घडली असेल" अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका यूजरने "विद्यार्थीच एसटी बसचं नुकसान करतात, हे बऱ्याच निरक्षणाअंती दिसून आले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे" .