पाणीपुरी वाल्याची कमाई पाहून जीएसटी विभागही हादरला; नोटीस व्हायरल, लोक म्हणतायत नोकरीच सोडू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 09:42 IST2025-01-05T09:42:02+5:302025-01-05T09:42:23+5:30
काही वर्षांपूर्वीपर्यंत ते रोखीनेच पैसे घ्यायचे. परंतू, जेव्हापासून युपीआय आले आहे, तेव्हापासून या लोकांची खरी कमाई उघड होऊ लागली आहे.

पाणीपुरी वाल्याची कमाई पाहून जीएसटी विभागही हादरला; नोटीस व्हायरल, लोक म्हणतायत नोकरीच सोडू...
नोकरदार वर्गापेक्षा नाष्टा सेंटर, पाणीपुरी, वडापावच्या टपऱ्यांची कमाई जास्त आहे. याचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. तरीही हे लोक त्यांच्या स्टॉलवर खायला येणाऱ्या नोकरदार वर्गाला सर, मॅडम म्हणतात. या लोकांची कमाई कधी उघड होत नव्हती. कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत ते रोखीनेच पैसे घ्यायचे. परंतू, जेव्हापासून युपीआय आले आहे, तेव्हापासून या लोकांची खरी कमाई उघड होऊ लागली आहे. आता रोखीने पैशांची देवाणघेवाण हे लोक लपवू शकतात, परंतू युपीआयद्वारे घेतलेली पेमेंट हे लपवू शकणार नाहीत.
तामिळनाडूमध्ये अशाच एका पाणीपुरीवाल्याची कमाई उघड झाली आहे. आजकाल अनेकजण युपीआयनेच पेमेंट करतात. तामिळनाडूच्या पाणीपुरीवाल्या भय्याने देखील युपीआय द्वारे पेमेंट घेण्यास सुरुवात केली होती. त्याने ऑनलाईन पेमेंटद्वारे वर्षाला ४० लाख रुपये कमविले आहेत. रोखीने पैसे घेतलेले वेगळेच. या रकमेवर त्याला जीएसटी विभागाची नोटीस आली आहे. ही नोटीस सोशल मीडियावर येताच नोकरदारांच्या मनात आपण गरीबच असल्याचे विचार घोळू लागले आहेत.
एक्सवर संजीव गोयल नावाच्या व्यक्तीने ही नोटीस पोस्ट केली आहे. यावरून लोक आपण चुकीच्या लाईनमध्ये आलो असल्याचे म्हणत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या नोटीसमध्ये १७ डिसेंबर २०२४ ही तारीख आहे. तामिळनाडू जीएसटी विभागाकडून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. या पाणीपुरीवाल्याकडे २०२३-२४ या आर्थिक वर्षातील व्यवहार मागविण्यात आले आहेत, तसेच मागील तीन वर्षांतील व्यवहारही त्याला देण्यास सांगण्यात आले आहेत.
आता या नोटीसनंतर इतर नाष्टा सेंटर, पाणीपुरीवाले सावध झाले तर ते युपीआय पेमेंट स्वीकारणे बंद करण्याची देखील शक्यता आहे. यामुळे खिशात पैसे न ठेवता युपीआय पेमेंटवर भिस्त ठेवून फिरणाऱ्या लोकांची अडचण होण्याची शक्यता आहे.