स्वप्नात दिसला तिकिटाचा नंबर अन् लागला जॅकपॉट; स्वप्नातील लॉटरीनं दिले खरे २,००,००,००० रु.! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 08:26 AM2022-07-18T08:26:54+5:302022-07-18T08:27:35+5:30

बडे़ दिलवाला! लॉटरीच्या पैशातील काही रक्कम ज्यांची काहीच ऐपत नाही, जे गरीब आहेत, दोन वेळच्या जेवणाचीही ज्यांना भ्रांत आहे, त्यांच्यासाठी खर्च करणार आहेत.

the ticket number was seen in the dream and the jackpot was hit dream lottery gave real 20000000 rupees | स्वप्नात दिसला तिकिटाचा नंबर अन् लागला जॅकपॉट; स्वप्नातील लॉटरीनं दिले खरे २,००,००,००० रु.! 

स्वप्नात दिसला तिकिटाचा नंबर अन् लागला जॅकपॉट; स्वप्नातील लॉटरीनं दिले खरे २,००,००,००० रु.! 

Next

स्वप्न पाहा आणि या स्वप्नांच्या पूर्तीसाठी स्वत:ला झोकून द्या.. त्यासाठी अखंड परिश्रम करा.. जे स्वप्नं पाहतात, त्यांचीच स्वप्नं सत्यात उतरू शकतात.. - माजी राष्ट्रपती आणि संशोधक, ‘मिसाइल मॅन ऑफ इंडिया’ एपीजे अब्दुल कलाम यांचे हे विचार. आपल्या प्रत्येक भाषणात तरुणांना स्वप्नं पाहण्यासाठी ते प्रेरित करीत. त्यांच्या भाषणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचाही तरुणांवर खूप मोठा प्रभाव होता. त्यांच्या सांगण्यामुळेच अनेकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी स्वप्नं पाहायला, त्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला सुरुवात केली. अनेक जण त्यात यशस्वीही झाले. कलाम यांच्या सांगण्याचा मुख्य भर होता नुसती स्वप्नंच पाहू नका, तर त्याच्या पूर्तीचा ध्यासही घ्या.

मात्र, अनेक जण असतात, जे स्वप्नं तर पाहतात; पण त्याच्या पूर्तीसाठी काहीही करीत नाहीत. नुसते हात धरून बसतात. अर्थातच अशा पोकळ स्वप्नांनी काहीही होत नाही, तरीही काही भाग्यवान असेही असतात, ज्यांचं नशीब नुसतं स्वप्न पाहिल्यानंही फळफळतं. त्यातलंच एक नाव आहे, अलोंझो कोलमन. अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील हा रहिवासी. एका दिवसापूर्वी रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला लॉटरीच्या तिकिटाचा एक नंबर दिसला. दुसऱ्या दिवशी त्याच क्रमांकाचं तिकीट त्यानं खरेदी केलं आणि त्याला जॅकपॉट लागला! 

किती रकमेचा हा जॅकपॉट होता? - तब्बल अडीच लाख अमेरिकन डॉलर्स! म्हणजेच भारतीय चलनात साधारण दोन कोटी रुपये! अलोंझो म्हणतो, माझाही स्वप्नांवर फारसा भरवसा नाही; पण दिसलंच आहे आपल्याला स्वप्नात, तर नशीब अजमावायला काय हरकत आहे, इतक्या वेळा आपण लॉटरीचं तिकीट घेतो, आतापर्यंत कधीच नशीब फळफळलं नाही, पण आता स्वप्नात दिसलेल्या क्रमांकाचंच तिकीट घेऊन पाहूया.. गाजराची पुंगी वाजली तर वाजली.. म्हणून त्याच क्रमांकाचं तिकीट मी विकत घेतलं आणि आश्चर्य म्हणजे या तिकिटाला खरोखरच जॅकपॉट लागला! माझा स्वत:चाच अजून या घटनेवर विश्वास बसत नाही!  

अलोंझोनं जे तिकीट खरेदी केलं त्या तिकिटाची किंमत केवळ दोन डॉलर होती. काही दिवसांपूर्वी टीव्हीवर या जॅकपॉटचा निकाल जाहीर करण्यात आला. या तिकिटाचा क्रमांकही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होता. टीव्हीच्या स्क्रीनवर जॅकपॉटच्या तिकिटाचा नंबर जाहीर करण्यात आला.  १३-१४-१५-१६-१७-१८.. ‘बोनस’ म्हणून पुढे १९ हा आकडाही होता. अलोंझोनं स्वत:ला दोन-तीनदा चिमटा घेऊन बघितला. स्वप्नात त्यानं जो नंबर पाहिला होता आणि ज्या क्रमांकाचं तिकीट त्यानं खरेदी केलं होतं, त्याचा आणि स्क्रीनवरचा नंबर अक्षरश: सारखा होता! पण पहिल्या सहा क्रमांकांनीच त्याला जॅकपॉट मिळवून दिला. पुढच्या क्रमांकांची त्याला गरजही पडली नाही. 

अलोंझोनं टीव्हीवर दाखवलेल्या क्रमांकाशी आपल्या तिकिटाचा क्रमांक दहा वेळा ताडून पाहिला तरी त्याचा त्यावर विश्वास बसत नव्हता. शेवटी लॉटरीच्या कार्यालयात त्यानं विचारपूस केली. तिथेही चार-चारदा आपल्या तिकिटाचा क्रमांक तपासून पाहिला. आपल्याच तिकिटाला जॅकपॉट लागल्याचं लक्षात आल्यानंतर मात्र त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

अलोंझो हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. नियमित आमदनी बंद झाल्यानं त्यांचं जीवन थोडंसं ओढग्रस्तीतच सुरू होतं. कुठल्या का मार्गानं होईना, पण आपल्याला उत्पन्न मिळावं असं त्यांना वाटत होतं, त्यात हा जॅकपॉट लागल्यानं त्यांचं आयुष्यच आता एकदम पालटून गेलं आहे. 

या लॉटरीच्या रकमेचा उपयोग आता ते आपल्या स्वप्नपूर्तीसाठी करणार आहेत. लहानपणापासून जी स्वप्नं त्यांनी पाहिली, आतापर्यंत जी केवळ स्वप्नंच राहिली होती, त्यांच्या पूर्तीसाठी आपल्याकडचा हा पैसा आता ते खर्च करणार आहेत; पण आणखीही एक महत्त्वाची गोष्ट ते करणार आहेत, ती म्हणजे ज्यांची काहीच ऐपत नाही, जे गरीब आहेत, दोन वेळच्या जेवणाचीही ज्यांना भ्रांत आहे, त्यांच्यासाठी यातील काही रक्कम ते खर्च करणार आहेत. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे.

दुधाच्या पिशवीने दिले १५.५ कोटी!

अशीच आणखी एक अनोखी घटना काही दिवसांपूर्वी अमेरिकेतच घडली आहे. साऊथ कॅरोलिना येथील एका व्यक्तीला तब्बल वीस लाख डॉलर्सची म्हणजे १५.५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. अर्थात कुठल्याही स्वप्नात त्याला लॉटरीच्या तिकिटाचा नंबर दिसला नव्हता. लॉटरीचा तो शौकीनही नव्हता. एका किराणा दुकानात दुधाची पिशवी तो घ्यायला गेला, तिथे लॉटरीची तिकिटं दिसली आणि त्यातलंच एक त्यानं खरेदी केलं. दुधाच्या पिशवीचं निमित्त झालं आणि तो मालामाल झाला!

Web Title: the ticket number was seen in the dream and the jackpot was hit dream lottery gave real 20000000 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.