सणासुदीच्या गर्दीत चोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 05:00 AM2021-09-13T05:00:00+5:302021-09-13T05:00:30+5:30
सध्या सणा-सुदीचे दिवस असून गर्दीमध्ये रोख रक्कम उडविणारी टोळी सक्रीय असते. यासोबतच मोबाईलवर ही हात मारला जातो. मागील काही दिवसात या टोळ्या शांत होत्या. आता पुन्हा त्यांनी आपले डोके वर काढले असून बाजारातील गर्दी व घाईगडबडीचा फायदा घेतला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ व चोरीच्या तक्रारी येत आहे. अनेकांनी तर तक्रार देण्याचेही टाळले आहे. हा सणासुदीच्या काळातील चोरट्यांचा उपद्रव पोलिसांसाठी आव्हान देणारा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील विठ्ठलवाडी भाजी बाजारात रविवार आणि गौरी-गणपतीच्या सणामुळे मोठी गर्दी जमली होती. याच संधीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. मोबाईल पडला की चोरीला गेला याचीही भनक त्यांनी अनेकांना लागू दिली नाही. शहर पोलिसांकडे मोबाईल हरविला व चोरीच्या चार तक्रारी रविवारी दाखल झाल्या.
गौरीच्या सणानिमित्त प्रत्येकाच्याच घरी जेवणावळी असतात. महाप्रसादासाठी तसेच नैवैद्याकरिता विविध प्रकारच्या भाज्यांची खरेदी केली जाते. भाजी बाजारात कधी नव्हे ती त्यामुळे गर्दी झाली. त्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी टपलेल्या मोबाईल चोरांनी हात साफ केले. अनेकांना आपला मोबाईल चुकून गहाळ झाला असेच वाटायला लागले. तर काहींना मोबाईल चोरी गेल्याची शंका आली. पहाटेच सण-उत्सवाच्या काळात गडबडीत असलेल्या अनेकांनी पोलीस ठाणे गाठणे टाळले. मात्र याही धावपळीत काहींनी कर्तव्य समजून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संतोष कळसकर रा. कृषीनगर यांनी त्यांचा १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली. याप्रमाणे अरुण महल्ले, गजानन सरोदे, केतन भवरे यांचेही मोबाईल गायब झाले. चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत हात चलाखीने मोठ्या प्रमाणात मोबाईल लंपास केले. सध्या सणा-सुदीचे दिवस असून गर्दीमध्ये रोख रक्कम उडविणारी टोळी सक्रीय असते. यासोबतच मोबाईलवर ही हात मारला जातो. मागील काही दिवसात या टोळ्या शांत होत्या. आता पुन्हा त्यांनी आपले डोके वर काढले असून बाजारातील गर्दी व घाईगडबडीचा फायदा घेतला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ व चोरीच्या तक्रारी येत आहे. अनेकांनी तर तक्रार देण्याचेही टाळले आहे. हा सणासुदीच्या काळातील चोरट्यांचा उपद्रव पोलिसांसाठी आव्हान देणारा आहे.
काही मिनिटात मोबाईल स्वीच ऑफ
- घाईगडबीत खिशातून पडलेला मोबाईल काही मिनिटात स्वीच ऑफ होणे शक्य नाही. गर्दीत चुकून आपला मोबाईल पडला असावा असा समज झाला. मात्र सुरू असलेला मोबाईल अचानक बंद कसा पडला यावरून संशय निर्माण झाला. एकाच वेळी अनेक जण मोबाईल नसल्याची तक्रार करू लागले. यावरून भाजीबाजारात चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याचे उघड झाले आहे. आता यात पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले.