डाळी-तांदळाला सोंडे लागले, डब्यांमध्ये 'या' गोष्टी ठेवाल तर धान्याला लागणार नाही कीड!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:37 PM2024-10-18T13:37:19+5:302024-10-18T13:39:20+5:30
धान्याला सोंडे किंवा कीड लागू नये म्हणून काही उपाय करता येतील. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. घराच्या स्वच्छतेसोबतच लोक घरांमध्ये धान्यही भरून ठेवत आहेत. कारण या दिवसांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन भरपूर केलं जातं. गहू, तांदूळ, वेगवेगळ्या डाळी, कडधान्य लोक डब्यांमध्ये भरून ठेवतात. मात्र, एक समस्या जास्तीत जास्त लोकांना भेडसावते, ती म्हणजे धान्यांमध्ये सोंडे लागणे किंवा कीड लागणे. धान्याला सोंडे, कीड किंवा अळ्या लागल्या तर अनेकदा धान्य फेकावं लागतं. अशात धान्याला सोंडे किंवा कीड लागू नये म्हणून काही उपाय करता येतील. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांद्वारे तुम्ही धान्य चांगलं आणि स्वच्छ ठेवू शकता.
कडूलिंबाची वाळलेली पाने
डाळी किंवा तांदळात कीटक, सोंडे लागू नये यासाठी त्यात तुम्ही कडूलिंबाची वाळलेली पाने ठेवू शकता. याच्या गंधाने कीटक बाहेर पडतात. पाने पूर्णपणे वाळलेली असावीत.
तमालपत्र
किचनमधील मसाल्यांमध्ये तमालपत्राचं महत्वाचं स्थान असतं. हे तमालपत्र देखील तुम्ही धान्यातील कीटक, सोंडे पळवून लावण्यासाठी वापरू शकता. याच्या गंधाने कीटक पळून जातात. धान्याच्या डब्यांमध्ये ही पाने तोडून ठेवा.
लसूण
लसणाचा गंध देखील कीटक, सोंडे पळवून लावण्यासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी धान्याच्या डब्यांमध्ये लसणाच्या काही कळ्या टाकून ठेवा. जेव्हा या कळ्या वाळतील तेव्हा त्या काढून डब्यात दुसऱ्या कळ्या टाकाव्यात.
काळी मिरी
काळी मिरीच्या माध्यमातून देखील तुम्ही धान्यातील कीटक, सोंडे पळवून लावू शकता. यासाठी धान्याच्या डब्यांमध्ये काळी मिरी कापडामध्ये बांधून ठेवू शकता.
आगपेटी
आगपेटी देखील कीटक पळवण्यासाठी फायदेशीर ठरते. यात सल्फर असतं. ज्यामुळे कीटक पळून जातात. यासाठी आगपेटी कापडात बांधून धान्याच्या डब्यात ठेवा.