ऐकावं ते नवलंच! ट्रक ड्रायव्हर ते YouTube स्टार; महिन्याला 5 ते 10 लाख रुपयांची कमाई...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 06:08 PM2024-08-19T18:08:33+5:302024-08-19T18:09:39+5:30
चार वर्षांपूर्वी महिन्याला 25-30 रुपये कमावणारे राजेश आज लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
R Rajesh Vlogs : सोशल मीडियाच्या जगात कुणीही, कधीही फेमस होऊ शकतो. तुमचा कंटेट लोकांना आवडला, तर ते तुम्हाला एका रात्रीत प्रचंड प्रसिद्धी अने पैसा मिळवून देतात. झारखंडमधील एका ट्रक ड्रायव्हरच्या बाबतीत असेच घडले आहे. 20 वर्षांपासून ट्रक चालवणारे राजेश रवानी आपल्या कंटेटच्या जोरावर इतके लोकप्रिय झाले की, कधीकाळी महिन्याला 25-30 हजार रुपयांची कमाई करणारे राजेश आज 5-10 लाख रुपयांची कमाई करत आहेत.
वडिलांच्या पावलावर पाऊल...
राजेश रवानी यांनी अलीकडेच YouTube मुलाखतीत आपल्या आयुष्याबद्दल सांगितले होते. झारखंडमधील जामतारा या छोट्या शहरात त्यांचा जन्म झाला, परंतु नंतर त्यांचे कुटुंब रामगडमध्ये स्थायिक झाले. राजेशचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते आणि कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांच्या वडिलांनी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम सुरू केले. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजेश यांनीही ट्रक ड्रायव्हरचा व्यवसाय निवडला.
अशी केली YouTube चॅनेलची सुरुवात
राजेश रवानी यांचे Youtube वर 'R Rajesh Vlogs' या नावाने चॅनेल आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी या चॅनेलची सुरुवात केली होती. या चॅनेलवर ते फूड आणि ट्रॅव्हल व्लॉगचे व्हिडिओ पोस्ट करतात. हळुहळू त्यांना प्रसिद्धी आणि पैसा मिळायला लागला. सध्या त्यांच्या चॅनेलवर 1.87 मिलियनहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. 25 वर्षांपासून ट्रक चालवणारे झारखंडमधील राजेश रवानी आज यूट्यूब स्टार बनले आहेत.
YouTube मधून किती कमाई होते?
एका मुलाखतीत राजेश यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने त्यांना यूट्यूब चॅनेलबद्दल माहिती दिली आणि त्यानेच चॅनेल सुरू करुन दिले. मुलाने वडिलांचे स्वयंपाक करतानाचे व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. हळुहळू लोकांना हे व्हिडिओ खूप आवडायला लागले. सध्या राजेश रवानी यूट्यूबच्या माध्यमातून महिन्याला 4 ते 5 लाख रुपयांची कमाई करतात. ही कमाई कमी-जास्त होत राहते. एखाद्या महिन्यात त्यांची कमाई 10 लाखांपर्यंत जाते. याच कमाईतून राजेश यांनी गावी एक कोटी रुपयांचे घरही बांधले आहे.