रातोरात फेमस झाली MA English चायवाली, शेकडो किमी प्रवास करुन भेटायला येताहेत लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 05:23 PM2021-11-11T17:23:50+5:302021-11-11T17:25:24+5:30
कोलकाताच्या टुकटुकी दासचे आई-वडील तिला नेहमी सांगायचे की जर तू खूप मेहनत केलीस तर तू इतकी मोठी होशील की आकाश सुद्धा ठेंगणं वाटू लागेल.
कोलकाताच्या टुकटुकी दासचे आई-वडील तिला नेहमी सांगायचे की जर तू खूप मेहनत केलीस तर तू इतकी मोठी होशील की आकाश सुद्धा ठेंगणं वाटू लागेल. तिच्या आई-वडीलांना आपल्या लेकीनं शिक्षिका व्हावं असं वाटायचं. टुकटुकीनं आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि परीक्षेत चांगले गुण देखील प्राप्त केले. आता तिनं इंग्रजी विषयात एमए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. पण अजूनही तिला नोकरी मिळू शकलेली नाही.
टुकटुकी दास हिनं नोकरीसाठी बऱ्याच परीक्षा देखील दिल्या. शक्य ते सारे प्रयत्न केले. पण यश काही आलं नाही. अखेर इंग्रजी विषयात एमए झालेल्या टुकटुकी हिनं चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताच्या हावडा स्थानकावर तिनं चहाचा दुकान सुरु केलं. स्टेशनवर टुकटुकीच्या चहाच्या दुकानाचं पोस्टर पाहूनच लोक तिच्या दुकानाजवळ थांबतात. तिच्या दुकानाचं नाव आहे 'एमए अंग्रेजी चायवाली'!
टुकटुकीचे वडील ड्रायव्हर आहेत आणि तिची आई एक छोटं किराणा सामानाचं दुकान चालवते. खरंतर टुकटुकीच्या चहाच्या दुकानाबाबत तिचे पालक नाराज होते. पण टुकटुकीनं 'एमबीए चहावाला'च्या कहाणीनं प्रेरित झाली होती. तिनं याबाबत इंटरनेटवर वाचलं होतं.
"कोणतंच काम छोटं नसतं असं मला वाटतं आणि त्यामुळेच मी 'एमबीए चायवाला' सारखंच आपलं चहाचं दुकान सुरू केलं. सुरुवातीला जागा मिळण्याबाबत थोड्या अडचणी आल्या, पण नंतर मला एक जागा मिळाली. आता मी चहासोबत नाश्ता देखील विकते. माझ्याकडे एमएची डीग्री आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. म्हणूनच मी दुकानाचं नाव तसं ठेवलं आहे", असं टुकटुकी सांगते.
"टुकटुकीनं घेतलेल्या निर्णयाशी सुरुवातीला आम्ही सहमत नव्हतो. कारण तिचं चांगलं शिक्षण झालं आहे. ती एक शिक्षिका होईल असं आम्हाला वाटत होतं. पण तिला चहा बनवताना पाहून वाईट वाटायचं. पुढे मी खूप विचार केला आणि तिला जर आत्मनिर्भर होण्याची इच्छा असेल तर तिला तिचा निर्णय घेऊ दिलं पाहिजे हे लक्षात आलं", असं टुकटुकीचे वडील प्रशांतो दास सांगतात.
टुकटुकीनं तिचं स्वत:चं एक यूट्यूब चॅनल देखील सुरू केलं आहे. त्यावर ती चहाच्या दुकानाचे आणि स्वत:चे व्हिडिओ अपलोड करत असते. टुकटुकीचे व्हिडिओ सोशल मीडियात रातोरात व्हायरल झाले आणि तिच्या व्यवसायाला लोकप्रियतेचं वलय प्राप्त झालं. आता तिला खास भेटण्यासाठी लोक दूरहून येतात आणि तिच्यासोबत फोटो, सेल्फी टिपतात.