Twin Tower Demolition Kid Viral Video: ट्विन टॉवर पाडण्याआधी चिमुरडीने देवाकडे केली खास विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 04:32 PM2022-08-28T16:32:27+5:302022-08-28T16:34:18+5:30
कोर्टाच्या आदेशानंतर ही इमारत आज जमीनदोस्त करण्यात आली
Twin Tower Small Girl Viral Video: नोएडाच्या सेक्टर 93A मध्ये असलेला ट्विन टॉवर आज जमीनदोस्त करण्यात आली. अवघ्या १० सेकंदात ही गगनचुंबी इमारत पाडण्यात आली. नियंत्रित स्फोट घडवून आणत तंत्रशुद्ध पद्धतीने ही इमारत पाडली गेली. ट्विन टॉवर पाडण्यासाठी २० कोटी रुपये खर्च झाले असून, त्याचा भार बिल्डरला उचलावा लागणार आहे. टॉवर कोसळण्यापूर्वी ते ठिकाण लोकांसाठी एका अर्थी सेल्फी पॉइंटच बनला होता. लोक इथे पोहोचून टॉवरसोबत सेल्फी घेत होते आणि सोशल मीडियावर ते फोटो, व्हिडीओ शेअर करत होते. याच दरम्यान एका चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तिने देवाकडे एक खास मागणी केली. (Trending on Social Media)
एका लहान मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही मुलगी एका पार्कमध्ये उभी असलेली दिसत आहे. मुलीच्या मागे सुपरटेक ट्विन टॉवर दिसत आहे. हाच टॉवर आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पाडण्यात आला. या टॉवरच्या पुढ्यात उभी राहून ती मुलगी देवाकडे एक विनंती करते. "सगळे जण या बिल्डिंगमुळे वैतागून गेले आहेत. (हा ट्वीन टॉवर पाडला जातोय हे) खूप छान आहे. पण मी देवाकडे अशी मागणी करते की यातून कोणाचं काही वाईट करू नकोस", अशी निरागस मागणी ही चिमुरडी देवाकडे करताना दिसत आहे. पाहा तो व्हिडीओ-
What Kids want about #TwinTower Demolition. #NoidaTowerDemolition#NoidaTwinTowerpic.twitter.com/DdtTyUvhzy
— Amit Shukla (@amitshuklazee) August 27, 2022
दरम्यान, स्थावर मालमत्तेतील बांधून झालेली इमारत पाडण्याची ही देशातील अशा प्रकारची पहिलीच कारवाई होती. त्यामुळे याची इतिहासात नोंद नक्कीच घेण्यात येईल. कारण बांधलेली इमारत पाडली गेली हा पहिलाच प्रकार आहे. इमारत पाडण्यापूर्वी फायनल ट्रिगर बॉक्सशी टॉवर जोडण्यात आला. त्यानंतर १० ते ० च्या उलट्या काउंटडाउननंतर एक मोठा पण नियंत्रित स्फोट झाला आणि इमारत १० सेकंदात जमीनदोस्त करण्यात आली. ट्विन टॉवरमध्ये असलेल्या लोकांना इमारत पाडण्याआधीच दुसऱ्या सोसायटीत आश्रय देण्यात आला. सर्व लोकांनी सुपरटेकच्या एमराल्ड सोसायटीमधून घरे रिकामी केली आणि मगच ही कारवाई करण्यात आली.