कहाँ से आते ये लोग! सार्वजनिक शौचालयात एकाच जागेत बसवल्या दोन टॉयलेट सीट, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:07 PM2022-12-22T12:07:03+5:302022-12-22T12:08:07+5:30
उत्तर प्रदेशातील बस्ती येथील एका शौचालयाची सध्या सोशल मीडियात खूप चर्चा होत आहे.
बस्ती-
उत्तर प्रदेशातील बस्ती येथील एका शौचालयाची सध्या सोशल मीडियात खूप चर्चा होत आहे. त्याचं झालं असं की कुणी एका महाभाग कॉन्ट्रॅक्टरनं एकाच बाथरुममध्ये दोन टॉयलेट सीट बसवण्याचा पराक्रम केला आहे. आता एकाच जागेत अगदी बाजूबाजूला अशा टॉयलेट सीटचा वापर तरी नेमका कसा करायाचा अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
बस्तीपासून २० किमी अंतरावर असलेल्या कुदरहा ब्लॉक येथे हा प्रकार घडला आहे. जिथं पंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या शौचालयातील एकाच जागेत अगदी बाजूबाजूला खेटून दोन टॉयलेट सीट बसवण्यात आल्या आहेत. यानंतर दोषी कॉन्ट्रॅक्टरविरोधात नोटीस जारी करण्यात आली आहे.
गौराधुंधा गावात बनवण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. गावचे सरपंच आणि सचिव यांनी १० लाख रुपये खर्चून या शौचालयाची उभारणी केली होती. पण या अजब बांधकामामुळे शौयालयाचा आजवर कुणीच वापर करू शकलेलं नाही.
शौचालय तर उभारलंय पण त्याला दरवाजेच बसवण्यात आलेले नाहीत. इतकंच काय तर एकाच जागेत दोन टॉयलेट सीट बसवण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची दखल आता पंचायत अधिकारी नम्रता शरण यांनी घेतली आहे आणि संबंधितांना नोटीस जारी केली आहे. तसंच कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
बांधकामात करण्यात आलेली चूक तातडीनं सुधारण्याचे आदेश देण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे आदेश देण्यात आल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.