डिलिव्हरी बॉयचा कारनामा! Uber Eats च्या ड्रायव्हरने चोरलं ऑर्डरमधील जेवण अन्...; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 12:03 PM2021-08-14T12:03:12+5:302021-08-14T12:14:51+5:30
Uber Eats driver steals portion of customers food : डिलिव्हरी बॉयने ऑर्डरमधील जेवण चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या Uber Eats च्या ड्रायव्हरचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याकडे अनेकांचा सध्या अधिक कल असतो. एकदा जेवण ऑर्डर केल्यानंतर ते कधी घरी येतं असंच अनेकांना वाटतं असतं. मोबाईलमध्ये अनेकदा आपण त्याचं लोकेशन देखील पाहत असतो. मात्र तुम्हाला खूप भूक लागलेली असताना जर ऑर्डर घरी आली नाही अथवा ऐन वेळी ऑर्डर कॅन्सल केली तर प्रचंड संताप होतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने ऑर्डरमधील जेवण चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या Uber Eats च्या ड्रायव्हरचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
Uber Eats चा ड्रायव्हर रस्त्याच्या कडेला बसून ऑर्डरमधून थोडं-थोडं जेवण चोरताना दिसत आहे. यातील काही पदार्थ काढून घेतल्यानंतर तो पुन्हा बॉक्स सील करतो आणि डिलिव्हरीसाठी निघतो. व्हिडीओमध्ये ड्रायव्हर आपल्या हाताने नूडल्स काढून प्लास्टिकच्या एका वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवतो. तसेच नूडल्सनंतर तो काही पीस आणि सूपदेखील त्याच डब्यामध्ये काढून घेतो, ज्यात त्याने नूडल्स काढले आहेत. यानंतर तो सगळे बॉक्स पुन्हा एकदा सील करून आपली सायकल घेऊन तिथून निघतो असं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
सोशल मीडिय़ावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर Uber Eats ने कारवाई करत या डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढून टाकलं आहे आणि ग्राहकाची माफी मागितली आहे. तसेच अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. याआधीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एक अजब घटना समोर आली होती. डिलिव्हरी बॉयने जेवणाची ऑर्डरच संपवल्याचा प्रकार समोर आला होता. लंडनमधील इली इलियास या 21 वर्षीय तरुणीने जेवणाची ऑर्डर केली होती. तिने बर्गर, चिप्स, आणि चिकन रॅपर अशी साधारण 20 डॉलर म्हणजेच साधारण 1456 रुपयांची ऑर्डर केली होती. तिने उबर इट्समधून (Uber Eats) ही ऑर्डर केली होती. मात्र बराच वेळ झाला तरी तरुणीची ऑर्डर काही आली नाही.
काही वेळानंतर तिला एक मेसेज आला. तो पाहून तर तिला धक्काच बसला. "सॉरी love, मी तुझं जेवण खाल्लं" असा मेसेज डिलिव्हरी बॉयने केला होता. इतकच नाही तर अॅपमध्ये जेवणाची ऑर्डर डिलिव्हर झाल्याचं दाखवत होतं. इलियाने या मेसेजचा एक स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला आणि हा उबेर इट्सचा ड्रायव्हर ठीक आहे ना, असा सवाल केला. त्यानंतर मात्र उबरने तिच्याशी संपर्क साधला व तिला मोफत जेवण पाठवलं होतं. मात्र या प्रकारानंतरही तिने ड्रायव्हरला दोष दिला नाही. कदाचित त्याला भूक लागली असेल. त्यामुळे माझं जेवण खाल्लं असेल, असं ती म्हणाली होती.