Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 04:56 PM2024-09-23T16:56:56+5:302024-09-23T16:59:34+5:30
Shivraj Singh Chouhan Video : रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांना बसला. खड्ड्यात अडकलेल्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न सगळीकडेच झाला. सोमवारी याचा फटका थेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना बसला. रस्त्यावरील खड्डा इतका खोल होता की, गाडी पुढेच जाऊ शकली नाही आणि चौहान यांना भरपावसात खाली उतरावे लागले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे सोमवारी (२३ सप्टेंबर) झारखंडच्या दौऱ्यावर होते. बहरागोडा येथे त्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी आलेल्या चौहानांची रस्त्यावरील खड्ड्यामुळे फजिती झाल्याचे बघायला मिळाले.
खड्ड्यात जाताच एका बाजूला झुकली गाडी
बहरागोडा येथे पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी भरले होते. रस्त्यावर असलेल्या एका भल्यामोठ्या खड्डयाचा अंदाज शिवराज सिंह चौहान यांच्या गाडी चालकाला आला नाही. गाडी पुढे जात असतानाच खड्ड्यात अडकली आणि एका बाजूला कलंडली.
गाडी खड्ड्यात फसली. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा जवानांची धावपळ झाली. गाडी एका बाजूला झुकल्याने केंद्रीय कृषिमंत्र्यांना भरपावसात खाली उतरावे लागले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH | Jharkhand | Union Minister Shivraj Singh Chouhan's car today got stuck in a muddy pothole amid rains today in Baharagora where he was for a public rally pic.twitter.com/ZYrZanee9K
— ANI (@ANI) September 23, 2024
केंद्रीय कृषिमंत्री बहरागोडामध्ये काय बोलले?
भरपावसात शिवराज सिंह चौहान यांनी जनसमुदायाला संबोधित केले. "पाऊस पडतोय, विजांचा कडकडाट होतोय, तरीही तुम्ही परिवर्तनासाठी इथे उभे आहात. हे दृश्य बघून मी सांगू शकतो की, 'अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा' आणि झारखंडमध्ये परिवर्तन होईल."