Video: २ वर्षापूर्वी बेपत्ता झालेली महिला समुद्रात तरंगताना आढळली; मच्छिमारांनी जिवंत बाहेर काढली
By प्रविण मरगळे | Published: September 30, 2020 06:13 PM2020-09-30T18:13:33+5:302020-09-30T18:28:59+5:30
समुद्रात असताना लांबून मला एक काठी दिसल्यासारखी झाली, जेव्हा जवळ गेलो तेव्हा महिला मदतीसाठी हात उंचावत होती, हे दिसलं त्यानंतर तातडीने तिची मदत करुन तिला बाहेर काढलं.
कोलंबिया - दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामधून एक घटना समोर आली आहे, ज्यावर तेथील लोकांनाही विश्वास ठेवणे कठीण आहे. याठिकाणी एक महिला गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता होती, तेव्हापासून या महिलेचा तिच्या कुटुंबीयांशी कोणताही संपर्क नव्हता. दोन वर्षापूर्वी पतीच्या हिंसक वागण्याने त्रस्त झालेली ही महिला घर सोडून गेली. मात्र २ वर्षानंतर आता जे काही घडले ते पाहून सगळ्यांना धक्का बसला.
ही महिला समुद्राच्या पाण्यात तरंगताना पाहायला मिळाली. या महिलेचं म्हणणं आहे की, ती पाण्यात बुडण्याचा प्रयत्न करत होती परंतु देवाने तिचे रक्षण केले. कुटुंबाला ही महिला कुठे आणि कशा अवस्थेत आहे याची काहीच कल्पना नव्हती. २६ सप्टेंबर रोजी अटलांटिका प्यूर्टो येथे कोलंबिय शहरापासून १ किमी अंतरावर समुद्रात ती तरंगताना आढळली. ४६ वर्षांची एंजेलिका गेल्टन असं या महिलेचे नाव आहे. रोनाल्डो विस्बल नावाच्या एका मच्छिमाराला ही महिला दिसली, तेव्हा ती खूप अशक्त अवस्थेत असल्याचं सांगितलं. विस्बलने ८ तासांपासून समुद्रात तंरगणाऱ्या एंजेलिकाला वाचवले.
एंजेलिकाला बाहेर काढल्यानंतर तिने स्थानिक माध्यमांना सांगितले की, मी आत्महत्या करण्यासाठी समुद्रात उडी मारली आहे. गेल्या २० वर्षांपासून माझ्या पतीकडून माझा छळ होत आहे यातून वैतागून मी स्वत:ला संपवण्याचा विचार केला. माझ्या नवऱ्याने मला कुटुंब आणि मित्रांपासून दूर केले असा आरोप महिलेने केला तर मच्छिमाराने सांगितलं की, समुद्रात असताना लांबून मला एक काठी दिसल्यासारखी झाली, जेव्हा जवळ गेलो तेव्हा महिला मदतीसाठी हात उंचावत होती, हे दिसलं त्यानंतर तातडीने तिची मदत करुन तिला बाहेर काढलं.
मला पुन्हा जन्म मिळाला
रिपोर्ट्सनुसार, एंजेलिका गेली आठ तास पाण्यात पोहत होती. ती खूप घाबरली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात सुखरूप पोहोचल्यावर एंजेलिकाने समुद्रात उडी घेण्याचा तिचा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितले. या ८ तासात देवाने माझे रक्षण केले, मला पुन्हा जन्म मिळाला आहे, त्यासाठी देवाचे मी आभार मानते. माझ्याकडे कोणतीही संधी किंवा मदत असती तर मी कधीही आत्महत्येचा निर्णय घेतला नसता. पण आता मी कृतज्ञ आहे कारण देवाने मला पुढे जाण्याची आणखी एक संधी दिली आहे असं तिने सांगितले.
नवऱ्याने केला जीवे मारण्याचा प्रयत्न
एंजेलिका म्हणाली की, तिच्या नवऱ्याने दोन्ही प्रेग्नेन्सीवेळी तिला वाईटरित्या मारहाण केली. तो शिवीगाळही करत असे. जेव्हा ती दुसऱ्यांदा गर्भवती झाली, तेव्हाही हे सुरुच होते. पण मुली लहान असल्याने मी काहीच करू शकत नव्हते. कधीकधी तिने तिच्या पतीविरोधात तक्रार देखील केली पण पोलीस २४ तासानंतर त्याला पुन्हा घरी सोडत असे. तो घरी परत यायचा आणि मारहाण करायचा. या २० वर्षांच्या नात्यात नवऱ्याने खूप वेळा एंजेलिकाला मारलं. आणि सप्टेंबर २०१८ मध्ये तिला ठार मारण्याचा प्रयत्नही केला असा आरोप तिने केला आहे.
सहा महिने रस्त्यावर फिरत राहिली.
इतके दिवस सहन करून तिने दोन वर्षांपूर्वी घर सोडले आणि सहा महिने रस्त्यावर फिरली. त्यानंतर तिला महिलांच्या शेल्टरमध्ये आश्रय मिळाला. पण इथेही तिला त्रास देण्यात आला. जेव्हा ती आंघोळीसाठी जात असे तेव्हा तेथील महिला पाणी बंद करत असे, या छळाला कंटाळली तिथूनही मला बाहेर काढण्यात आलं, त्यावेळी मी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं एंजेलिकाने सांगितले.