Video - Hershey’s च्या चॉकलेट सिरपमध्ये सापडला मेलेला उंदीर; कंपनीने दिला रिप्लाय, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 02:24 PM2024-06-19T14:24:06+5:302024-06-19T14:24:57+5:30
एका महिलेने दावा केला आहे की, Hershey’s चॉकलेट सिरपमध्ये तिला मेलेला उंदीर सापडला आहे. याचा व्हिडिओही शेअर केला आहे
मुंबईतील मालाडमध्ये एका आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट सापडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच दरम्यान आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने दावा केला आहे की, Hershey’s चॉकलेट सिरपमध्ये तिला मेलेला उंदीर सापडला आहे. याचा व्हिडिओही शेअर केला आहे. महिलेने हे झेप्टोवरून ऑर्डर केल्याचं सांगितलं. इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली असून कंपनीकडूनही यावर आता उत्तर देण्यात आलं आहे.
प्रामी नावाच्या महिलेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. "माझ्या झेप्टो ऑर्डरमध्ये एक हैराण करणारी गोष्ट आढळली. सर्वांचे डोळे उघडावेत यासाठी ही माहिती दिली जात आहे" असं म्हटलं आहे. यानंतर ती Hershey’s चॉकलेट सिरपची बॉटल उघडते आणि नंतर ते सिरप एका पांढऱ्या ग्लासमध्ये ओतते, तेव्हा तिला यामध्ये एक मेलेला उंदीर दिसतो.
महिलेने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, "आम्ही ब्राउनी केकसोबत खाण्यासाठी झेप्टोमधून Hershey’s चं चॉकलेट सिरप मागवलं होतं. जेव्हा आम्ही ते केकवर ओतायला सुरुवात केली तेव्हा त्यामध्ये छोटे-छोटे केस सतत दिसू लागले. मग आम्ही ते पूर्ण ओतून पाहण्याचा निर्णय घेतला. एका ग्लासमध्ये ओतलं असता मेलेला उंदीर आढळून आला. तो उंदीर आहे की आणखी काही हे शोधण्यासाठी आम्ही तो पाण्याखाली धुतला. तेव्हा तो उंदीर असल्याचं समोर आलं."
चॉकलेट सिरप कंपनी Hershey's ने या पोस्टला उत्तर दिलं आहे. "हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटतं. कृपया आम्हाला बॉटलवरील UPC आणि मॅन्युफॅक्चरींग कोड customercare@hersheys.com वर रेफरेन्स नंबर ११०८२१६३ सह पाठवा, जेणेकरून आमच्या टीमचा सदस्य तुम्हाला मदत करू शकेल!" असं म्हटलं आहे. सोशल मीडिया युजर्स या पोस्टवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.