Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 02:59 PM2024-11-25T14:59:09+5:302024-11-25T15:00:20+5:30
सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय.
Social Media Viral Video : प्रेमात विश्वासघात मिळाल्यावर त्याची/तिची काय अवस्था होते, हे फक्त त्याला/तिलाच समजू शकतं. विशेषतः मुलींकडून विश्वासघात मिळाल्यानंतर मुलं ती गोष्ट खूप मनाला लावून घेतात. काहीजण यातून सावरतात, तर काहीजण आपले आयुष्य खराब करुन घेतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बंगळुरुच्या रस्त्यांवर भीक मागणाऱ्या तरुणाचा आहे. व्हिडिओत तो आईनस्टाईनच्या 'थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी'वर अस्खलित इंग्रजीत चर्चा करताना दिसतोय. या तरुणाच्या दाव्यानुसार, एकेकाळी तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत इंजिनीअर होता, प्रेयसी सोडून गेल्यामुळे त्याची अशी अवस्था झाली.
इंस्टाग्राम यूजर शरथने या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, ही व्यक्ती फिजिक्स विषयावर इंग्रजीतून चर्चा करताना दिसतोय. शरथच्या दाव्यानुसार, या व्यक्तीने फ्रँकफर्ट, जर्मनी येथून मास्टर्सचे शिक्षण घेतले असून, एकेकाळी 'माईंड ट्री ग्लोबल व्हिलेज'मध्ये प्रोडक्ट इंजिनीअर पदावर काम केले आहे.
प्रेयसी अन् आई-वडील गमावल्याचं दुःख
शरथने सांगितले की, प्रेयसी आणि आई-वडील गमावल्यामुळे या व्यक्तीची अशी अवस्था झाली. या दु:खातून सावरण्यासाठी तो दारु प्यायला लागला अन् त्याच्या खूप आहारी गेला. हळूहळू त्याची अवस्था अशी बिकट झाली की, त्याला रस्त्यावर भीक मागावी लागली. त्याच्या प्रेयसी आणि आई-वडिलांना नेमकं काय झालंय, हे समजू शकलं नाही.
व्हिडिओचा पहिला भाग पाहा
व्हिडिओचा दुसरा भाग पाहा
व्हिडिओमध्ये हा व्यक्ती बंगळुरुच्या जयनगर भागात भीक मागताना दिसतोय. या व्हिडिओ तो आपल्या आयुष्यातील अडचणींबद्दल सांगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्याने आणि विचारांनी सर्वांनाच चकीत केले आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक नेटकरी त्या व्यक्तीबद्दल दु:ख व्यक्त करत आहेत, तर काहींनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा सल्लाही दिला. त्याला योग्य मदत मिळाली, तर तो त्याचे आयुष्य पुन्हा चांगले बनवू शकते, असे काहींचे मत आहे. शरथने त्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केला, काही स्वयंसेवी संस्थांशी संपर्कही केला, मात्र त्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारची मदत घेण्यास नकार दिला.