Video - "मला iPhone15 हवा"; नाण्यांचं पोतं घेऊन आला भिकारी, मोजताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 12:37 PM2023-10-17T12:37:22+5:302023-10-17T12:37:44+5:30
जोधपूरमधील एका मोबाईल शोरूमचा हा व्हिडीओ आहे. भिकाऱ्याच्या वेशात असलेल्या या व्यक्तीला काही मोबाईलच्या दुकानांनी आत येऊ दिले नाही.
भारतात महागड्या आयफोनकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिलं जातं. आयफोनच्या वेगवेगळ्या सीरिजने युजर्सला नेहमीच आकर्षित केलं आहे. हा फोन विकत घेतल्यानंतर लोक किडनी विकून हा फोन विकत घेत असल्याच अनेक मीम्समध्ये दाखवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे 'एक्सपेरिमेंट किंग' नावाच्या इन्स्टाग्राम चॅनलचा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, भिकाऱ्याचा पेहराव केलेला एक व्यक्ती आयफोन-15 खरेदी करण्यासाठी येतो आणि एका पोत्यात भरलेली नाणी पैसे म्हणून देतो.
जोधपूरमधील एका मोबाईल शोरूमचा हा व्हिडीओ आहे. भिकाऱ्याच्या वेशात असलेल्या या व्यक्तीला काही मोबाईलच्या दुकानांनी आत येऊ दिले नाही. त्याच्या फाटलेल्या कपड्यांमुळे अनेक दुकानांनी नाण्यांनी भरलेलं पोतं स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी, एका दुकानाने त्या माणसाचे पेमेंट मोड स्वीकारण्यास सहमती दर्शविली.
भिकाऱ्याने जमिनीवर ते पोतं रिकामं केलं, दुकानदार आणि त्याचे कर्मचारी व्हिडिओमध्ये नाणी मोजताना दिसत आहेत. त्यानंतर तो आयफोन प्रो मॅक्स घेतो, आयफोन नीट आहे का हे पाहतो आणि त्याच्यासोबत फोटोसाठी पोज देतो. तो दुकान मालकासोबत फोटोही काढतो. हा व्हिडीओ 34 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि त्याला अनेक लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.
अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला आहे, ज्यामध्ये काहींनी मोबाइल स्टोअरच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे. एका युजरने म्हटलं की, "हे स्क्रिप्टेड आहे... आजकाल कोणीही भिकारी या व्यक्तीसारखा दिसत नाही." दुसरा म्हणाला, "दुकानदारांनी त्यांच्या ग्राहकांचा आदर करायला शिकले पाहिजे, मग ते कोणीही असो, गरीब असो की श्रीमंत." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.