Video - "मी कर्मचारी आहे, तुझी नोकर नाही..."; एअर होस्टेस अन् पॅसेंजरमध्ये विमानात तुफान राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:55 PM2022-12-22T15:55:47+5:302022-12-22T16:05:28+5:30
इंडिगोच्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यात झालेल्या जोरदार भांडणाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.
इंडिगोच्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यात झालेल्या जोरदार भांडणाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. तुर्कीच्या इस्तंबूल शहरातून दिल्लीला येत असलेल्या विमानातील राड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यात जेवणावरून जोरदार वाद होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ 16 डिसेंबरचा आहे. यामध्ये भांडणादरम्यान प्रवाशाने एअर होस्टेसला "तुम्ही प्रवाशांचे नोकर आहात’ असं म्हटलं.
एअर होस्टेसने देखील यावर प्रवाशाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. "मी एक कर्मचारी आहे, तुमची नोकर नाही..." असं म्हटलं आहे. या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तसेच प्रवाशाने भांडण होत असताना एअर होस्टेसला "तू का ओरडत आहेस? गप्प बस" असं देखील म्हटलं. या संपूर्ण प्रकरणावर अनेकांनी भाष्य केलं असून सोशल मीडिया युजर्सनी एअर होस्टेसची बाजू घेतली आहे. क्रू मेंबर्सचा आदर केला पाहिजे असं म्हटलं आहे.
Tempers soaring even mid-air: "I am not your servant"
— Tarun Shukla (@shukla_tarun) December 21, 2022
An @IndiGo6E crew and a passenger on an Istanbul flight to Delhi (a route which is being expanded soon with bigger planes in alliance with @TurkishAirlines ) on 16th December : pic.twitter.com/ZgaYcJ7vGv
जेट एअरवेजचे सीईओ संजीव कपूर हे केबिन क्रूच्या बाजूने बोलले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "मी आधी म्हटल्याप्रमाणे, क्रू मेंबर्स देखील माणूस आहेत. त्यांना ब्रेकिंग पॉईंटवर आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली असेल. गेल्या काही वर्षांत मी फ्लाइटमध्ये क्रूला कानाखाली मारताना आणि शिवीगाळ करताना पाहिले आहे. नोकर आणि त्यापेक्षाही वाईट म्हटलं जातं. ती आता बरी आहे अशी आशा आहे" असं म्हटलं आहे.
इंडिगोच्या म्हणण्यानुसार, हा मुद्दा कोडशेअर कनेक्शनद्वारे प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी निवडलेल्या खाद्यपदार्थाशी संबंधित होता. DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेचा शोध घेत आहोत आणि योग्य ती कारवाई केली जाईल. इंडिगोने सांगितले की, "आम्हाला 16 डिसेंबर 2022 रोजी इस्तंबूल ते दिल्ली या फ्लाइट 6E 12 मध्ये घडलेल्या घटनेची माहिती आहे. ही समस्या कोडशेअर कनेक्शनद्वारे प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी निवडलेल्या जेवणाशी संबंधित होती. इंडिगो आपल्या ग्राहकांच्या गरजांबद्दल जागरूक आहे आणि आमच्या ग्राहकांना विनम्र आणि त्रासमुक्त अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही घटनेचा तपास करत आहोत." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"