Video: ‘अच्छा चलता हूँ दुवाओं मै याद रखना’; मृत्यूपूर्वी हॉस्पिटलमध्ये युवकानं गायलं गाणं, नेटिझन्स भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 10:58 AM2020-07-13T10:58:45+5:302020-07-13T10:59:22+5:30
एका व्हिडिओमध्ये, हॉस्पिटलमध्ये ऋषभने गिटार वाजविला आणि २०१६ मधील अभिनेता रणबीर कपूरच्या 'ऐ दिल है मुश्कील' मधील 'चन्ना मेरेया ...' हिट गाणे गायले होते.
नवी दिल्ली – सोशल मीडियावर सध्या आसाममधील एका मुलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जे पाहत आहेत नकळत त्यांच्याही डोळ्यातून पाणी येत आहे. ऋषभ दत्ता(Rishab Dutta) च्या आवाजाला अनेकांनी मनमुरादपणे दाद दिली. ९ जुलै रोजी बंगळुरुच्या हॉस्पिटलमध्ये त्याचं निधन झालं. १७ वर्षाचा ऋषभ दत्ता त्याच्या गाण्यामुळे व्हायरल झाला आहे.
लोकांनी त्याच्या गाण्याला पसंती दिली असून रातोरात इंटरनेट हा व्हिडीओ व्हायरल झाला. दोन वर्षांपूर्वी ऋषभला अप्लास्टिक एनेमीया या दुर्मिळ आजाराचं निदान झालं आणि दुर्दैवाने त्यांचे निधन ९ जुलै रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर ऋषभच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला. ते ऐकून लोकांना अश्रू अनावर होत आहेत. फेसबुक युजर मंजीत गोगोई यांनी ऋषभच्या गाण्याचे दोन व्हिडिओ पोस्ट केले आणि या क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
एका व्हिडिओमध्ये, हॉस्पिटलमध्ये ऋषभने गिटार वाजविला आणि २०१६ मधील अभिनेता रणबीर कपूरच्या 'ऐ दिल है मुश्कील' मधील 'चन्ना मेरेया ...' हिट गाणे गायले होते. २०१३ च्या जवानी है दिवानी हे लोकप्रिय गाणे त्यांनी गायले होते. त्याने हातातील गिटारमधून संगीत दिले आणि मधुर आवाजात गाणं गायलं. त्यावेळी ऋषभच्या रुममध्ये आरोग्यसेवा कर्मचारी आणि परिचारिका उपस्थित होत्या, त्या ऋषभला प्रोत्साहित देत होत्या.
ऋषभच्या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि शेअर मिळालेत. व्हिडीओ पाहून लोक खूपच भावूक झाले. एका युजर्सनं लिहिले की, तुम्ही आम्हाला संगीताद्वारे खूप प्रेरित केले. आपण अमर आहात. दुसर्या युजर्सनं लिहिले, 'तू मला रडवलेस. तुम्ही जिथे असाल तिथे आनंदी रहा. ऋषभ दत्ता हा आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपोथरचा होता. सुरुवातीला त्यांच्यावर वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये आणि नंतर बंगळुरूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.