नादच खुळा! आमदार, खासदारही ऐकेनात; मग म्हस बनली प्रमुख पाहुणी अन् उदघाटनही केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 06:47 PM2022-07-22T18:47:45+5:302022-07-22T18:52:18+5:30
गावकऱ्यांनी बस स्थानकाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून चक्क म्हशीला आणले.
गडग ।
अनेकवेळा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आपल्या मतदारांकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरून आंदोलनं, निषेध अशा मार्गांचा अवलंब करते. मात्र कर्नाटकमधील एका गावातील लोकांनी अनोख्या अंदाजात निषेध व्यक्त केला आहे. तब्बल ४० वर्षांपासून अधिकाऱ्यांनी किंवा आमदाराने बस स्ठानक बांधले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्वत: पैसे गोळा करून बसस्थानक बांधले आणि त्याच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हशीला आणले.
दरम्यान, नेते मंडळींनी गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांनी बसस्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चक्क म्हशीला आमंत्रित केले. सध्या या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या घटनेमुळे भारतीय जनता पार्टीचे नेते सत्ताधारी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधत आहेत.
चक्क म्हशीने केले उद्घाटन
ही सर्व घटना कर्नाटक राज्यातील गडग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील बालेहोसुर गावातील आहे. बालेहोसुर गावातील ग्रामस्थ मागील ४० वर्षांपासून गावात बस स्थानक व्हावे ही मागणी करत होते. बांधकामाअभावी बस स्थानकाचे रूपांतर डम्पिंग यार्डमध्ये झाले. कडक उन्हात आणि मुसळधार पावसात प्रवाशांना या ठिकाणाजवळ बसची वाट पाहावी लागते म्हणून गावकऱ्यांनी अनोखे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले.
गावकऱ्यांनी एकत्र येत नारळाच्या फांद्यापासून एक छप्पर तयार केले आणि म्हशीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. या बसस्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी म्हशीला सजवून आणण्यात आले आणि नंतर म्हशीच्या उपस्थिती उद्घाटन करण्यात आले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदाराने लवकरात लवकर बसचे शेल्टर बांधणार असल्याचे आश्वासन दिले आहे.