"मी चूक मान्य करतो पण तिला..."; बंगळुरुमधील 'त्या' ऑटो चालकाने सांगितली दुसरी बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 02:44 PM2024-09-16T14:44:45+5:302024-09-16T14:50:11+5:30

बंगळुरुमधील व्हायरल झालेल्या ऑटो चालकाने आपली बाजू मांडत येत असलेल्या अडचणींबाबत भाष्य केलं आहे.

Viral auto driver in Bangalore claims that he did not assault the woman | "मी चूक मान्य करतो पण तिला..."; बंगळुरुमधील 'त्या' ऑटो चालकाने सांगितली दुसरी बाजू

"मी चूक मान्य करतो पण तिला..."; बंगळुरुमधील 'त्या' ऑटो चालकाने सांगितली दुसरी बाजू

Bengaluru Auto Driver Viral Video : आठवड्याभरापूर्वी कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील एका रिक्षा चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. एका महिलेने ॲपद्वारे बुक केलेली राइड रद्द केल्यावर ऑटोचालकाने तिच्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता. ऑटो चालकाने आपल्याला कानाखाली मारल्याचेही महिलेने व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर महिलेने सोशल मीडियावर ओला कंपनीला टॅग करुन या घटनेची माहिती दिली होती. याप्रकरणी ऑटो चालकावर कारवाई देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता या चालकाने आपली बाजू मांडली आहे.

तक्रारदार महिलेने ॲपद्वारे बुक केलेली राइड रद्द केल्यावर ऑटो चालक संपला होता. त्याने महिलेवर आरडाओरड करण्यास सुरुवात केली आणि तिला अपशब्द वापरले. महिलेने हा सगळा प्रकार तिच्या मोबाईलमध्ये कैद केला जो नंतर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ऑटो चालक महिलेवर ओरडत असताना दिसत आहे. यावेळी महिलेने आपल्याला मारहाण झाल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर आता महिला प्रवाशाला कानाखाली मारल्याच्या आरोपाखाली आठवड्याभरापूर्वी अटक करण्यात आलेल्या ऑटो चालकाची पोलीस कोठडीतून सुटका करण्यात आली आहे. मुथुराज असे या ऑटो चालकाचे नाव असून त्याने महिलेला मारहाण केली नसल्याचे म्हटलं आहे. पोलिसांना फोन करू नये म्हणून मी महिलेचा मोबाईल पकडला होता असा दावा मुथुराजने केला आहे.

एका स्थानिक यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ऑटो चालकाने आपलं म्हणणं मांडले. यामध्ये मुथुराजने फोन हिसकावून घेण्याची आपली चूक कबूल केली पण आपण कधीही महिलेला मारहाण केली नाही असे ठामपणे सांगितले. "मी माझी चूक मान्य करतो कारण मी तिचा फोन पकडायला नको होता. पण व्हिडीओमध्ये तिने दावा केल्याप्रमाणे मी तिला कानाखाली मारली नाही. तिने पोलिसांना फोन करणे थांबवण्यासाठीच मी मोबाईल घेतला," असं मुथुराजने सांगितले.

दुसरीकडे, या घटनेचा मुथुराजवर गंभीर परिणाम झाला आहे. महिलेच्या आरोपांनंतर ओला आणि उबेरसारख्या सर्व प्रमुख कंपन्यांनी मुथुराजवर बंदी घातली आहे. त्याला धमकीचे फोनही आले आहेत. "घटना घडल्यानंतर लगेचच, ओला आणि उबेर सारख्या सर्व ऍग्रीगेटर ॲप्सनी मला ब्लॉक केले. मला अज्ञात लोकांकडून फोनही आले ज्यांनी तुला संपवून टाकू अशी धमकी दिली," असे मुथुराजने सांगितले.

तसेच काहींनी मुथुराजला पाठिंबा देत मदतही केली आहे. मिळालेल्या आर्थिक पाठिंब्याबद्दल मुथुराजने कृतज्ञता व्यक्त केली. "मला बऱ्याच लोकांकडून आर्थिक पाठबळ मिळाले आणि त्यांनी माझी बाजू समजून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सामान्य माणूस म्हणून, मला कायदेशीर अडचणींचा सामना कसा करायचा याची कल्पना नाही. मी ऑटो युनियनला भेटेन आणि माझ्या क्षमतेनुसार काय करता येईल ते बघेन," असेही मुथूराजने म्हटलं.
 

Web Title: Viral auto driver in Bangalore claims that he did not assault the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.