देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:02 AM2024-10-02T09:02:40+5:302024-10-02T09:04:12+5:30
उत्तर प्रदेशातील गऊघाट येथील एका मंदिरातील मूर्ती चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली होती, आता चोराने पुन्हा मूर्ती परत केली आहे.
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सात दिवसापूर्वी गऊघाट येथील एका आश्रमातील अष्टधातुची मूर्ती चोराने चोरली होती. यामुळे आश्रमातील महंत यांनी अन्नत्याग केला होता. मूर्ती चोरल्याच्या सात दिवसानंतर चोराने पु्न्हा ती मूर्ती परत केल्याचे समोर आले आहे. मूर्तीसोबत चोराने एक चिठ्ठी ठेवली. या पत्रात त्याने माफी मागितली आहे.
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
'महाराज जी, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे, मी मूर्ती चोरल्यापासून माझे मोठे नुकसान होत आहे, कृपया मला क्षमा करा', असा चोराने या चिठ्ठीत लिहिले आहे. २३ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा खालसा आश्रमाच्या मंदिरातून अष्टधातूची राधा-कृष्णाची मूर्ती चोरीला गेली. आश्रमाचे महंत स्वामी जयरामदास महाराज यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास केला, मात्र चोरटे सापडले नाहीत.
दरम्यान, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर असलेल्या गौघाट लिंक रोडवर पोत्यात गुंडाळलेली मूर्ती वाटसरूंनी पाहिल्यानंतर त्यांनी स्वामी जय रामदास महाराज यांना माहिती दिली. यानंतर मूर्ती खालसा आश्रमात नेण्यात आली. या गोणीत एक चिठ्ठी होती. जयरामदास महाराजांनी राधाकृष्णाच्या मूर्तीचा जलाभिषेक केला, पुन्हा त्याच मंदिरात प्रतिष्ठापना केली आणि पूजा सुरू केली.
आश्रमातील मूर्ती मिळाल्याने भाविक आनंदित झाले. चोराने माफीनामा लिहिलेले पत्रही महंत यांनी पोलिसांना दाखवले.
चोराने चिठ्ठीत काय लिहिले?
'महाराज जी प्रणाम, माझ्याकडून मोठी चूक झाली. अज्ञानाने मी राधा-कृष्णाची मूर्ती चोरली होती. मूर्ती चोरीला गेल्यापासून मला भयानक स्वप्न पडत आहेत. माझ्या मुलाची तब्येत बिघडली आहे. थोड्या पैशासाठी मी खूप वाईट काम केले आहे. मूर्ती विकण्यासाठी मी खूप छेडछाड केली आहे. माझ्या चुकीबद्दल माफी मागून मी मुर्ती सोडत आहे.
माझी चूक माफ करून देवाला पुन्हा मंदिरात स्थान द्यावे अशी विनंती करतो. त्याची ओळख लपवण्यासाठी पॉलिश करून त्याचा आकार बदलण्यात आला आहे. महाराज आमच्या मुलांना क्षमा करा आणि तुमची मूर्ती स्वीकारा', असं या चिठ्ठीत लिहिले आहे.