टीव्ही पार्ट्सचा वापर करुन साकारली प्रभू श्रीरामाची प्रतिकृती; 'Video' पाहून नेटकरी भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 04:35 PM2024-01-15T16:35:14+5:302024-01-15T16:37:13+5:30
टीव्हीवर प्रभू श्री रामाची प्रतिकृती उमटवणाऱ्या तरुणाने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Viral Video : संपूर्ण भारत देश हा येत्या २२ जानेवारी या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहतोय. या ऐतिहासिक दिवशी राम मंदिराचा उद्धाटन सोहळा पार पडणार आहे. अशा नेत्रदीपक सोहळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला येणार असल्याची माहिती मिळते आहे.
या पार्शभूमीवर सध्या देशभरात 'जय श्रीराम' चे नारे ऐकू येत आहेत.२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील दिग्गज, साधुसंत महंत या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाच्या आयोध्यानगरीचे किंवा राम मंदिराच्या बांधकामाची माहिती देणारे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच.
नुकताच सोशल मीडियावर एका अनोख्या राम भक्ताचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. प्रभू श्री रामाची अशीही प्रतिकृती साकारता येऊ शकते याची कल्पना कोणालाच आली नसेल. या तरुणाची आयडिया पाहून नेटकरी भारावून गेल्याचे पाहायला मिळते आहे.
आपण घरातील वापरात नसलेली एखादी वस्तू सहज भंगारात किंवा इतरत्र फेकून देतो. पण याउलट अशा टाकाऊ वस्तुंचा सदुपयोग कसा करावा हे या तरुणाने दाखवले. घरातील वापरात नसलेल्या टीव्हीच्या एकेक पार्टचा त्याने शक्कल लढवत वापर केला आहे. खराब झालेले टीव्ही पार्ट त्यापासून काढून तरुणाने काहीतरी युनिक करुन दाखवलं आहे.
व्हायरल व्हिडीओनूसार, घरातील खराब कलर टीव्ही फेकून देण्यापेक्षा तिचा उपयोग प्रभू श्री रामाची प्रतिकृती साकारण्यात केला आहे. सुरुवातीला त्याने टीव्हीचे सर्व पार्ट खोलून त्याची वेगवेगळ्या प्रकारे मांडणी केली. आपल्या घरामध्ये भींतीला पडदा बांधला. डीम लाईटचा उजेड करत तरुणाने आपला प्रयोग यशस्वी केला आहे. शेवटी टीव्हीच्या पार्टची सावली पडद्यावर उमटलेली दिसतेय. प्रभू श्री राम, माता सीता तसेच बंधु लक्ष्मणाची हुबेहुबे सावली पडद्यावर उमटलेली दिसत आहे. या राम भक्ताची ही कल्पना नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळते आहे.
पाहा व्हिडीओ :-