Video : ७२ फूट रुंदीच्या भव्य जहाजाचा अनोखा रेकॉर्ड, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:29 PM2019-10-18T12:29:01+5:302019-10-18T12:40:04+5:30
ग्रीस हा देश आपल्या इतिहासासोबतच आपल्या सौंदर्यासाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. येथील एका जहाजाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे.
ग्रीस हा देश आपल्या इतिहासासोबतच आपल्या सौंदर्यासाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. येथील एका जहाजाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत कोरिन्थ कॅनालमधून जात असलेलं एक जहाज दाखवण्यात आलं आहे. आता म्हणाल यात का वेगळेपण आहे? तर हा कॅनॉलची रूंदी २४ मीटर म्हणजे ७८.७ फूट आहे. यातून एमएम ब्रीमर हे ७२ फूट रूंदीचं जहाज जाताना दिसत आहे.
या कॅनॉलमधून जाणारं आतापर्यंतचं हे सर्वात मोठं जहाज क्रूज आहे. याची लांबी १९६ मीटर(६४३ फूट), वजन २४ हजार टन इतकं आहे. आता एवढं मोठं जहाज इतक्याशा बोळीतून जात आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना. हा एकप्रकारचा रेकॉर्डच झाला आहे. या कॅनॉलमधून जाताना जहाजावर १२०० प्रवाशी होते. हा कॅनॉल ६ किमीपेक्षाही जास्त लांबीचा आहे. अशात जहाजाच्या कॅप्टनला किती घाम फुटला असेल हे काही वेगळं सांगायला नको. जहाज कॅनॉलमधून जात असताना दोन्ही बाजून केवळ ३ फूटांचं अंतर होतं.
कोरिन्थ कॅनॉलची निर्मिती १८९० मध्ये सुरू करण्यात आली होती. १८९३ मध्ये याचं काम पूर्ण झालं. छोट्या जहाजांसाठी हा कॅनॉल तयार करण्यात आला होता. या कॅनॉलच्या भिंती पाण्यापासून ३०० फूट उंचीवर आहेत. आता इतकं मोठं जहाज एवढ्याशा जागेतून मार्ग काढतंय हे बघणं खरंच आश्चर्यकारकच मानलं पाहिजे.