पाव्हणं जेवला काय...! गाऊनवाल्या बाईंचा 'गौतमी' स्टाइल डान्स व्हायरल, अवधुत गुप्तेचंही 'स्टेटस'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 04:26 PM2023-05-22T16:26:58+5:302023-05-22T16:28:08+5:30
Social Viral: गाऊनवाल्या बाईंचा हा भन्नाट डान्स बघून तुमचीही पावलं थिरकली नाहीत तरच नवल!
सोशल मीडियावर एखादी गोष्ट लोकांच्या पसंतीस पडली, की ती व्हायरल व्हायला क्षणाचाही विलंब लागत नाही. ती गोष्ट व्हायरल होऊन थांबत नाही, तर तो ट्रेंड बनतो आणि फॉलोही केला जातो. असाच एका गाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, तो आहे गाऊनवाल्या बाईंचा! हो हो! गाऊनवालीबाई असा त्यांचा हॅशटॅगच आहे.
अमरावतीच्या रश्मी सोनवणे या ताई घरगुती कपड्यांवर अर्थात गाऊनवर व्हिडीओ करतात, अपलोड करतात आणि ते व्हायरलही होतात. त्यात त्यांच्या अहोंचा आणि कौटुंबिक सदस्यांचाही सहभाग असतो. दैनंदिन जीवनातील छोटे मोठे प्रसंग, विनोद आणि त्यांची बेधडक नृत्यशैली लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. लॉक डाऊनमध्ये टिक टॉकपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास युट्युब, मौज, शेअर चॅटवर अविरत सुरु आहे. त्यांचे इंस्टाग्रामवर एक लाख चाळीस हजार फॉलोवर्स आहेत, तर फेसबुकवर एक लाख एकोणसाठ हजार फॉलोवर्स आहेत.
अशातच त्यांनी केलेला एक व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की त्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आणि ते कमी म्हणून कि काय, तर गायक अवधूत गुप्ते यांनी तो व्हिडिओ आपल्या स्टेट्सला ठेवत त्यांचे कौतुकही केले आहे. तो व्हिडीओ नेमका कोणता ते पाहू-
गायिका राधा खुडे यांनी गायलेलं 'पाव्हणं जेवला काय?' हे गाणं काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालं. मात्र लावणी डान्सर गौतमी पाटील हिने त्या गाण्यावर डान्स केल्यापासून ते अधिक लोकप्रिय झालं. गाऊनवाल्या ताईंनी सहज म्हणून या गाण्यावर व्हिडीओ केला आणि इंस्टाग्राम व फेसबुकवर शेअर केला आणि त्यांच्या भन्नाट डान्स व्हिडीओने धुमाकूळच घातला! त्यांची बिनधास्त नृत्यशैली पाहूनच की काय, गायक अवधूत गुप्ते यांनाही तो व्हिडीओ स्टेट्सवर ठेवायचा मोह अनावर झाला असावा. एव्हाना व्हिडीओबद्दल तुमचीही उत्सुकता वाढली असेलच, तर बघा त्या व्हिडिओची झलक-