गुगल मॅप येणार अडचणीत? Map ला फॉलो करत सुरू होता प्रवास, तुटलेल्या पुलावरून पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 06:40 PM2023-09-21T18:40:46+5:302023-09-21T18:41:18+5:30
Google map मुळे आपला प्रवास आता सोपा झाला आहे.
Google map मुळे आपला प्रवास आता सोपा झाला आहे. गुगल मॅप आपल्याला रस्त्यांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर देतं, त्यामुळे आपला वेळही वाचतो. पण, कधी कधी गुगल मॅप रस्त्याची माहिती चुकीची दाखवते. त्यामुळे मोठं नुकसान होतं, अशीच एक घटना समोर आली आहे. गुगल मॅपने एका व्यक्तीचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. यात त्या व्यक्तीचा जागीच मृ्त्यू झाला आहे. आता हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे.
शॉकिंग! डाकीण समजून जमावाने महिलेसह तिच्या पतीला खाऊ घातली स्मशानातील राख
गुगल मॅपने चुकीच्या दिशा दाखविल्याने पुलावरून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने आता गुगलला न्यायालयात खेचले आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणाऱ्या एका महिलेने आरोप केला आहे की, तुटलेल्या पुलाबद्दल गुगलला वारंवार माहिती देऊनही कंपनीने तो पूल गुगल मॅपवर वाहतुकीसाठी योग्य असल्याचे दाखवले. गुगल मॅपने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे तिच्या पतीने पुलावर गाडी वळवली आणि पूल तुटल्यामुळे तो खाली पडला आणि पाण्यात बुडून मृत्यू झाला.
नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणारा फिलिप पॅक्सन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अपघाताचा बळी ठरला होता. यूएस नेव्हीमधून निवृत्त झालेले पॅक्सन वैद्यकीय उपकरणे विकायचे. त्यांच्या मृत्यूनंतरही गुगल मॅप्सने अद्याप त्या तुटलेल्या पुलाची माहिती दुरुस्त केलेली नाही. शवेटी त्यांची पत्नी अॅलिसियाने आता गुगलवर दावा ठोकला आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिच्या मुलीचा आणि तिच्या पतीच्या मित्राच्या मुलीचा वाढदिवस होता. दोन्ही मित्रांनी आपल्या मुलींचा वाढदिवस एकत्र साजरा केला होता. वाढदिवसाची पार्टी आटोपल्यानंतर अॅलिसिया मुलांना घेऊन घरी आली. पॅक्सन काही कामात मागे राहिला. रात्री कारने घरी परतत असताना पाऊस सुरू झाला. मार्ग स्पष्ट दिसत नसल्याने त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गात तुटलेल्या पुलाचाही समावेश होता. गुगल मॅप्सने हा पूल कार्यान्वित असल्याचे दाखवले. गुगल मॅपने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून पॅक्सनने गाडी पुलावर वळवली. पूल तुटल्यामुळे पॅक्सन कारसह सुमारे २० फूट खाली पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.