सलाम...! ३ तासांतच नवजात बाळाला गमावलं; त्यानंतर तिनं सर्वात मोठं दान केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 02:30 PM2019-11-27T14:30:00+5:302019-11-27T14:40:25+5:30
आई होण्याचा अनुभव सर्वात खास मानला जातो आणि आईचं दूध हे नवजात बाळासाठी सर्वाच पौष्टिक. आईच्या दुधामुळेच बाळाची वाढ होते आणि बाळ निरोगी राहतं.
आई होण्याचा अनुभव सर्वात खास मानला जातो आणि आईचं दूध हे नवजात बाळासाठी सर्वाच पौष्टिक. आईच्या दुधामुळेच बाळाची वाढ होते आणि बाळ निरोगी राहतं. बाळाच्या जन्मानंतर आईच्या स्तनांना पाझर फुटू लागतो. ती या नव्या अनुभवाची वेगवेगळी स्वप्ने रंगवत असते. पण अशात जर एखाद्या आईला आधीच माहीत असेल की, आपलं बाळ काही तासांसाठी जगणार आहे तर...? त्या आईची स्थिती काय होऊ शकते हे खरंतर त्या आईशिवाय कुणीही सांगू शकणार नाही. अशीच एक मनाला चटका लावून जाणारी आणि तेवढीच प्रेरणादायी घटना समोर आली आहे. एका आईने बाळाला जन्म दिला. बाळ केवळ ३ तास तिच्या कुशीत होतं. पण त्यानंतर ते बाळ जगू शकलं नाही. पण त्यानंतर या आईने जे केलं त्याला तुम्ही नक्कीच सलाम कराल.
या महिलेचं नाव आहे सिएरा स्ट्रॅंगफेल्ड. सिएराला आधीच या गोष्टीची कल्पना होती की, तिचं बाळ फार जास्त वेळ जगणार नाही. डॉक्टरांनी तिला आधीच सांगितलं होतं की, बाळाला Trisomy 18 हा आजार आहे. हा एक दुर्मिळ आनुवांशिक आजार असून यात बाळाच्या जीवाला धोका असतो. ही समस्या शरीरात अतिरिक्त क्रोमोजोम १८ मुळे निर्माण होते आणि यात शरीराचा विकास उशीरा होतो. सिएराने 'टुडे' सोबत बोलताना सांगितले की, डॉक्टरांनी गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. पण तिला तिच्या बाळाला भेटायचं होतं. काही तासांसाठी का होईना तिला बाळाला जवळ घ्यायचं होतं.
सिएरा पुढे म्हणाली की, 'सॅम्युअल केवळ एकदाच माझ्या कुशीतून दूर गेला. त्यावेळी डॉक्टर त्याला ऑक्सिजन ट्यूब लागवत होते. आम्ही दोघांनी ते तीन तास सोबत घालवले. मी त्याला स्पर्श करू शकत होती. मी त्याला स्पर्श केल्यावर त्याचा हार्ट रेट आणि ऑक्सिजन रेट अचानक वाढला. जसे त्याला कळत होते की, तो आईसोबत आहे. मी तीन तास त्याला एकटक बघतच होते. पण ते तीन तास जणू काही मिनिटांमध्ये संपले'.
त्या तीन तासातच सिएराने एक निर्णय घेतला. तिने निर्णय घेतला की, ती तिचं दूध दान करणार. तिची अशी इच्छा होती की, ज्या बाळांना ब्रेस्ट मिल्सची गरज आहे त्यांना हे दूध मिळावं. ती म्हणाली, 'माझ्या बाळाचं जीवन आणि मृत्यूवर नियंत्रण नाहीये. पण त्यानंतर मी तेच केलं जे माझ्या नियंत्रणात होतं'.
सिएरा म्हणाली की, अमेरिकेत राहणाऱ्या अनेक बाळांचे जीव माझ्या ब्रेस्ट मिल्कने वाचू शकतात. सिएराने ६३ दिवस पम्पच्या माध्यमातून तिचं दूध एकत्र केलं आणि ते १५ लिटर दूध मदर मिल्क बॅंकला दान केलं. सिएराने तिचा हा अनुभव फेसबुक लोकांसोबत शेअर केला. तिने लिहिले की, 'पम्पिंग अवघड आहे. मानसिक आणि शारीरिक दोन्ही रूपाने. हे तेव्हा आणखी कठीण होऊन जातं, जेव्हा तुमच्याकडे तुमचं बाळ नसतं'.