धक्कादायक! ऑपरेशन सुरू असताना महिला रडली; रुग्णालयानं बिलात अधिकची रक्कम जोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 04:52 PM2021-10-01T16:52:25+5:302021-10-01T16:55:25+5:30
महिलेच्या बिलात अतिरिक्त रक्कम जोडली; रुग्णालयाचा प्रताप; सोशल मीडियाकडून रुग्णालयाचा समाचार
रुग्णालयात उपचार सुरू असताना तुमच्या भावना व्यक्त केल्यावर काय होतं..? उपचार सुरू असताना वेदनेनं, भावनेच्या भरात तुम्हाला अश्रू अनावर झाले तर..? या अश्रूंसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात का? नाही ना..? पण एका रुग्णालयानं हा कारनामा केला आहे. रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असताना महिला रडली. याबद्दल रुग्णालयानं तिच्याकडून अतिरिक्त रक्कम घेतली. भावना व्यक्त केल्याचं शुल्क म्हणून रुग्णालयानं महिलेकडे बिलातून अधिकच्या रकमेची मागणी केली. ते पाहून महिलेला धक्काच बसला.
रुग्णालयात जाणं कोणालाच आवडत नाही. रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आलीच, तर कधी एकदा डिस्चार्ज मिळतोय, असं रुग्णाला वाटत असतं. रुग्णालयात उपचार घेत असताना भावुक होणं स्वाभाविक आहे. मात्र अमेरिकेतल्या एका महिलेला शस्त्रक्रियेवेळी भावुक होणं महागात पडलं आहे. शस्त्रक्रियेवेळी भावुक झाल्यानं महिलेच्या बिलात अधिकची रक्कम जोडण्यात आली. महिलेनं तिला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
महिलेनं रुग्णालयानं तिला दिलेलं बिल सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यात ब्रीफ इमोशनचा उल्लेख आहे. यासाठी रुग्णालयानं ११ डॉलर (८०० रुपयांपेक्षा अधिक) आकारले आहेत. महिलेनं शेअर केलेलं बिल पाहून अनेकांनी रुग्णालयातील यंत्रणेला धारेवर धरलं आहे. रुग्णालयांकडून केल्या जाणाऱ्या वसुलीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी महिलेनं तिचं बिल सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या ट्विटला जवळपास दोन लाख लाईक्स आणि १५ हजारांहून अधिक रिट्विट मिळाली आहेत.