एकीकडे अंत्यसंस्काराची तयारी, तितक्यात मृत महिला उठली अन् पाणी मागितलं, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 02:26 PM2024-01-01T14:26:35+5:302024-01-01T14:26:59+5:30
ही घटना हमीरपूरच्या कोतवाली येथील कैंथा गावातील आहे.
हमीरपूर - उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथं अजब-गजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी दिर्घकाळापासून आजारी असलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोक तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते. तिला स्मशानभूमीत घेऊन जाताना वाटेतच ही महिला उठली. तिने शरीरावरील पांढरे कापड फाडून फेटून दिले. हे दृश्य पाहून अनेकजण भीतीने थरथर कापायला लागले. त्यानंतर महिलेने पिण्यासाठी पाणी मागितले असता कुटुंबाने मोकळा श्वास घेतला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात याची चर्चा व्हायरल झाली आहे.
ही घटना हमीरपूरच्या कोतवाली येथील कैंथा गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कैंथा गावात राहणाऱ्या मातादीन रैकवार यांच्या ३३ वर्षीय पत्नी अनिता खूप दिवसांपासून आजारी होती. तिला ब्लड कॅन्सर झाला होता. पत्नीच्या उपचारासाठी मातीदानने काहीच बाकी ठेवले नाही. पत्नी ठीक व्हावी यासाठी पती तिला घेऊन मध्य प्रदेशातील छतरपूर, भोपाळ, जालंधर, चंदीगड, अमृतसर याठिकाणी उपचाराला नेले. परंतु कुठेही पत्नीला बरे वाटले नाही. अखेर अनिताने जालंधरच्या एका हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतल्याचे पुढे आले.
पत्नीच्या मृत्यूनंतर मातादीन आणि कुटुंबाला धक्का बसला. पत्नीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. तिचा मृतदेह स्मशान भूमीला घेऊन जात होते. घरापासून काही अंतरावर पोहचले तितक्यात अनिता उठून बसली. हे पाहून माणसं दूर झाली. महिलेने पांढरे कापड फाडून फेटले आणि पिण्यासाठी पाणी मागितले. हे दृश्य पाहून आणि ऐकून अनेकांच्या अंगावर काटा आला. मध्य प्रदेशातील नौगाव इथं मातादीन यांच्या पत्नीवर उपचार सुरू होते. मातादीन यांचे मित्र राजू रैकवार यांच्या इथेच राहून पत्नीवर उपचार सुरू होते.
या उपचारावेळी पत्नीची तब्येत ढासळली त्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णवाहिकेला ३० हजार देऊन तिचा मृतदेह घराकडे घेऊन जात होते. नोएडा येथे पोहचल्यावर पत्नी अनिता यांच्या मृतदेहाची हालचाल झाली. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत तिने आवाज दिला. जेव्हा लोकांनी पाहिले तेव्हा ती जिवंत असल्याचे समोर आले. या महिलेने पाणी मागितल्यावर तिला पाणी पाजण्यात आले. परंतु या प्रकारामुळे जिल्ह्यात ही घटना व्हायरल झाली.