साहसी पराक्रम नडला! महिलेने सेफ्टी रोप न बांधताच ८२ फूटावरुन खाली उडी मारली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 09:02 AM2021-10-12T09:02:08+5:302021-10-12T09:02:35+5:30
हे दृश्य पाहून उपस्थित सगळेच लोक मोठ्याने ओरडले. परंतु कुणालाही काहीच करता आलं नाही.
नूरसुल्तान – जगभरात अनेक जण असे आहेत ज्यांना साहसी खेळ करायला आवडतात. मोठमोठ्या उंचावर दरीत उडी घेतात. परंतु हा खेळ खेळताना आवश्यक ती काळजी घेतलेली असते. परंतु नूरसुल्तान येथे घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. याठिकाणी साहसी खेळाची आवड असणाऱ्या महिलेला जीव देऊन किंमत मोजावी लागली आहे. ३ मुलांची आई असलेली महिला फ्रि फ्लाइंग स्पोर्टसचा आनंद घेण्यासाठी गेली होती. परंतु तिच्या एका चुकीमुळे जीव गमवावा लागला आहे.
ही महिला सेफ्टी रोपशिवाय हॉटेलच्या छतावरून खाली उडी मारली त्यामुळे तिचा मृत्यू झाला. महिलेला तात्काळ हॉस्पिटला घेऊन गेले परंतु तिचा जीव वाचला नाही. यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या आहेत. डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, ३३ वर्षीय येवगेनिया लियोन्टिवा(Yevgenia Leontyeva) साहसी पराक्रम करण्यासाठी कजाकिस्तानच्या कारागांडा येथील एका हॉटेलच्या छतावर गेली होती. त्यांच्यासोबत स्पोर्ट्स आयोजित करणारी लोकंही होती. परंतु इतकं असूनही एक मोठी चूक झाली. येवगेनियाने सेफ्टी रोप न बांधताच ८२ फूट उंचावरुन खाली उडी मारली.
Jump मारल्यानंतर जाणवलं
या ह्द्रयद्रावक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात उडी मारल्यानंतर जेव्हा येवगेनियाला जाणवलं की तिने सेफ्टी रोप घातलेलं नाही. तेव्हा ती किंचाळू लागली. हे दृश्य पाहून उपस्थित सगळेच लोक मोठ्याने ओरडले. परंतु कुणालाही काहीच करता आलं नाही. येवगेनियाला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले. परंतु गंभीर जखम आणि जास्त रक्त वाहिल्याने तिचा मृत्यू झाला. डॉक्टरने येवगेनियावर सर्जरीही केली परंतु काही वेळातच या महिलेने अखेरचा श्वास घेतला.
वेळेपूर्वीच उडी मारली
प्रत्यक्षदर्शींच्या मते, येवगेनिया लियोन्टिवाने वेळेपूर्वीच छतावरुन उडी मारली. ज्यामुळे ट्रेनरला सेफ्टी रोप लावण्याची संधीच मिळाली नाही. मृत्यूपूर्वी येवगेनियाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्यात लिहिलं होतं की, आम्ही उडायला चाललो आहे. या मृत महिलेला १४ वर्षापेक्षा कमी वयाची ३ मुलं आहेत. या दुर्घटनेनंतर संपूर्ण कुटुंब हादरलं आहे. ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे अनेकजण फ्री फ्लाइंग करण्यासाठी जातात. मात्र या घटनेनंतर आता हे स्थळ बंद करण्यात आलं आहे.