हत्तींच्या कळपासमोर घेत होते सेल्फी, संतापलेल्या हत्तींनी घेतला असा बदला की...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 12:21 PM2022-08-08T12:21:27+5:302022-08-08T15:38:36+5:30
काही तरुणांनी हत्तींच्या कळपासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त हत्तींनी जे केलं ते पाहूनच धडकी भरेल.
हत्ती अवाढव्य आणि वन्यप्राणी असला तरी तो इतर प्राण्यांप्रमाणे हिंसक नसतो. हत्ती क्वचितच चवताळतात पण चवताळले तर समोरच्याच काही खरं नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काही तरुणांनी हत्तींच्या कळपासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त हत्तींनी जे केलं ते पाहूनच धडकी भरेल.
सध्या सेल्फीची इतकी क्रेझ आहे की लोक कुठेही आणि कधीही सेल्फी घेताना दिसतात. अशात क्वचितच पाहायला मिळणारे प्राणी अचानक दिसले की मग सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. आपला जीव धोक्यात टाकून ते सेल्फी घेताना दिसतात. असाच प्रयत्न या तरुणांनी केला. हत्तींचा कळप रस्त्यावर दिसताच गाडीतून उतरून हे तरुण अगदी स्टाइलमध्ये छाती ताणून हत्तींसोबत सेल्फी घ्यायला गेले. त्यांना पाहून हत्तीही चवताळले.
व्हिडीओत पाहू शकता हत्तींचा कळप रस्ता ओलांडून जंगलाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जात आहे. हत्तींना पाहताच काही तरुण ज्या गाडीत होते, त्यांनी ती गाडी थांबवली आणि ते गाडीतून खाली उतरले. त्यानंतर त्यांनी हत्तींसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. एक तरुण रस्त्याच्या मधोमध उभा राहिला. दुसरा रस्त्याच्या कडेला. ज्याने आपल्या हातात मोबाईल धरला आहे. आपल्यासोबत हत्ती कॅमेऱ्यात येतील अशा पद्धतीने त्याने मोबाईल धरला आणि दोघंही पोझ देऊ लागले.
हत्तींचं लक्ष या तरुणांकडे गेलं. त्यानंतर कळपाचा प्रमुख हत्ती चवताळला. तो या तरुणांच्या मागे धावत आला. त्याच्यापाठोपाठ इतर हत्तीही पळत आले. ते पाहून तरुणही घाबरले आणि ते गाडीच्या दिशेने पळू लागले. आता या तरुणांचं काही खरं नाही असं वाटतं. पण या तरुणांचं नशीब चांगलं म्हणून चवताळलेले हत्ती लगेच शांत होतात आणि ते आपली दिशा बदलतात. पुन्हा जंगलात जाऊ लागतात.
आपल्याला कुणी हानी पोहोचवू नये यासाठी हत्तींनी या तरुणांना फक्त घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण खरंच ते चवताळले असते तर या तरुणांचं काही खरं नव्हतं. हत्तींनी त्यांना पायाखाली चिरडून टाकलं असतं.
Selfie craze with wildlife can be deadly. These people were simply lucky that these gentle giants chose to pardon their behaviour. Otherwise, it does not take much for mighty elephants to teach people a lesson. video-shared pic.twitter.com/tdxxIDlA03
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) August 6, 2022
आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. वन्यजीवांसोबत सेल्फीचं क्रेझ जीवघेणं ठरू शकतं, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सना धडकी भरली आहे. असा मूर्खपणा करणाऱ्या या तरुणांविरोधात संताप व्यक्त केला आहे.