रशियन महिलेला पाहून तरुणाने म्हटलं '६००० रुपये'; पत्नीबाबत लाजिरवाणं वाक्य ऐकून संतापला पती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:46 IST2025-01-10T14:29:13+5:302025-01-10T14:46:25+5:30
राजस्थानमध्ये रशियन महिलेला पाहून भारतीय तरुणाने केलेल्या अश्लील कमेंटमुळे नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रशियन महिलेला पाहून तरुणाने म्हटलं '६००० रुपये'; पत्नीबाबत लाजिरवाणं वाक्य ऐकून संतापला पती
Udaipur Viral Video: आपल्या कुटुंबातील स्त्रियांना बाहेर सन्मानपूर्वक वागणूक मिळावी असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी. जसे तुम्ही इतरांच्या आई, बहीण आणि पत्नीसोबत करता तशीच वागणूक तुमच्याही कुटुंबालाही मिळू शकते. याची अनेकांना कल्पना असूनही ते इतर महिलांची छेड काढण्यासारखे प्रकार करत असतात. अशातच राजस्थानमध्ये एका परदेशी महिलेवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार महिलेच्या पतीसमोरच घडला जो भारतीय आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या तरुणावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
सोशल मिडियावर बंधणे नसल्याने अनेक नको त्या गोष्टीही सहजपणे फॉरवर्ड होताना दिसतात. एखादी वाईट गोष्ट क्षणार्धात लाखो-कोटी लोकांपर्यंत पोहोचते. गेल्या काही काळापासून, अनेक स्टँड अप कॉमेडियन रशियन महिला आणि मुलींबद्दल असभ्य विनोद करताना दिसतात. युट्यूबर मिथिलेश आपल्या पत्नीसह राजस्थानमधील उदयपूर येथील सिटी पॅलेसला भेट देण्यासाठी गेला आहे. त्यावेळी एका तरुणाने त्याच्या बायकोला पाहून '६ हजार' असं म्हटलं. यामुळे दुखावलेला मिथिलेशने त्या तरुणाचा व्हिडिओ काढला आणि त्याला चांगलेच सुनावलं.
मुंबईतील ट्रॅव्हल ब्लॉगर मिथिलेश आपल्या रशियन पत्नी आणि मुलासह उदयपूर किल्ल्यात फिरत होता. तेव्हा तिथून जाणारा एक तरुण त्याच्या पत्नीला पाहून अश्लील कमेंट केली. त्या तरुणाने मिथिलेशच्या बायकोला पाहिलं आणि ६ हजार रुपये असं म्हटलं. त्यानंतर ब्लॉगर मिथिलेशने त्या तरुणाला बोलवलं आणि तू सहा हजार म्हटलं ते मी ऐकलं असं सांगितले. त्यानंतर मिथिलेश कॅमेरा त्या तरुणाकडे दाखवून, मी माझ्या कुटुंबासह जात आहे, माझी पत्नी रशियन आहे. तू सहा हजार असं म्हटलं, असं म्हणताना दिसत आहे.
यानंतर मिथिलेश तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांना सांगतो की, "मी माझ्या पत्नीसोबत जात आहे आणि हा अश्लील कमेंट करत आहे. पोलिसांना बोलवा." यानंतर बिथरलेला तरुण मी तुम्हाला बोललो नाही असं वारंवार म्हणत होता. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी छेड काढणाऱ्या भारतीय तरुणाला धारेवर धरलं आहे. ग्रामीण भागातल्या तरुणांमुळे भारताची प्रतिष्ठा खराब होत आहे यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण कसे ठेवायचे माहीत नाही, पण ते थांबवणे गरजेचे आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. आणखी एका युजरने ,"भारतात कुठेही जा आणि गोरी त्वचा असलेले लोक पाहून लोक घाणेरड्या कमेंट करू लागतात."