नदीच्या पाण्यात व्हिडीओ शूट करताना सापडला आयफोन... सुरू करताच झाला हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:28 PM2019-10-02T15:28:48+5:302019-10-02T16:54:13+5:30
जर तुमचा फोन पाण्यात पडला तर काय होणार? काही वेळातच खिशाला कात्री लागू शकते. अशातच जर हा आयफोन असेल तर मग खर्च सांगायलाच नको.
जर तुमचा फोन पाण्यात पडला तर काय होणार? काही वेळातच खिशाला कात्री लागू शकते. अशातच जर हा आयफोन असेल तर मग खर्च सांगायलाच नको. परंतु, एका यूट्यूबरला नदीमध्ये एक आयफोन सापडला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो व्यवस्थित चालू होता. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, हा फोन जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त वेळापासून नदीमध्ये पडलेला असावा.
यूएसमधील यूट्यूबर मायकल बेनेट (Michael Bennet) नगेटनॉगिंग (Nuggetnoggin) नावाचं एक चॅनल चालवतो. याआधीही मायकलने पाण्यामध्ये अनेक किमती वस्तू शोधल्या आहेत. परंतु, यूएस साउथ कॅलिफोर्नियातील एडिस्टो नदीमध्ये डीप डायविंग दरम्यान मेटल डिटेक्टरच्या मदतीने त्याला हा आयफोन सापडला असल्याचेही त्याने सांगितले.
हा व्हिडीओ मायकलने काही दिवस अगोदर आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला होता. जो आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे.
तुम्हीही पाहू शकता हैराण करणारा हा व्हिडीओ :
मायकलने डब्लूडीएएम7 नावाच्या एका न्यूज चॅनलल सांगितले की, हा फोन नक्की कोणाचा आहे, हे ओळखणं फार अवघड होतं. कारण फोनला पासवर्ड होता. परंतु आम्ही त्या फोनमधील सिम कार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकलं आणि या फोनच्या मालकाला शोधलं.
हा आयफोन एरिका बेनेट नावाच्या एका महिलेचा होता. महिलेचा हा फोन 19 जून 2018 या दिवशी फॅमिली ट्रिपसाठी गेली असताना नदीमध्ये पडला होता. एरिकाने सांगितलं की, तिला हा फोन पुन्हा मिळाल्यामुळे ती फार खूश आहे. हा आयफोन पाण्यापासून फोन वाचवणाऱ्या एका कव्हरमध्ये होता. यामुळे तो खराब झाला नाही.
याआधीही मायकलला अनेक मोबाइल सापडले असून त्यांना त्यांच्या ओनरपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्यतेवढे प्रयत्न मायकलने केले आहेत. याव्यतिरिक्त त्याला अॅपल वॉच, सोन्या अंगठी, कॅश, चाकू आणि ज्वेलरी यांसारख्या गोष्टी सापडल्या आहेत.