उजनीत मागील २४ तासात १ टीएमसी पाणी जमा; उजनी धरणात २७ टक्के पाणीसाठा
By Appasaheb.patil | Published: September 28, 2023 07:59 PM2023-09-28T19:59:40+5:302023-09-28T20:00:39+5:30
धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेला विसर्गही कमी करून तो ३००० क्युसेक करण्यात आला आहे.
टेंभुर्णी : मागील दोन दिवस पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट माथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे बंडगार्डन व दौंड येथून येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ झाल्याने उजनी धरणाचीपाणी पातळी झपाट्याने वाढत असून मागील २४ तासात १ टीएमसी पाणी जमा झाले आहे. धरणाची टक्केवारीही २७ झाली आहे. तर एकूण जलसाठा ७८ टीएमसी एवढा झाला आहे. धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेला विसर्गही कमी करून तो ३००० क्युसेक करण्यात आला आहे.
उजनी धरणाच्या वरील बाजूसस असलेल्या १९ पैकी ११ धरणे शंभर टक्के भरले आहेत तर ४ धरणे ९०% च्या पुढे गेली आहेत. खडकवासला धरणही ८५ टक्के भरले आहे. त्यामुळे वरील पिंपळजोगे, वडज, डिंभे, कळमोडी, चासकमान, भामाआसखेड, वडिवळे, आंध्रा व कासारसाई या १० धरणातून १०८०५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बंडगार्डन येथून येणाऱ्या विसर्गात वाढ होऊन तो ११०६१ क्युसेक तर दौंड येथून येणारा विसर्ग १८३४९ एवढा झाला आहे . तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जवळपास दोन महिने पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे .आता रब्बीचा हंगाम तरी हाती लागणार का? उजनी धरण भरणार का? या चिंतेत शेतकरी असताना मागील चार-पाच दिवसापासून सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यातच उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने का होईना वाढत असल्याने उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
उजनी धरणास २८ सप्टेंबर रोजी ४३ वर्षे झाले असून ४४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मागील ४३ वर्षात उजनी धरण 32 वेळा शंभर टक्के भरले आहे. चालू वर्षी ते शंभर टक्के भरणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
धरणाची सद्यस्थिती -
- एकूण पाणी पातळी ४९२.९२०मीटर
- एकूण जलसाठा ७८ टीएमसी
- उपयुक्त साठा १४.३९ टीएमसी
- टक्केवारी २६.८७
- बंडगार्डन ११०६१ क्युसेक
- दौंड १८३४९ क्युसेक