एकाच दिवसात सोलापुरात आढळले १० कोरोनाचे रूग्ण; एकाचा मृत्यू
By Appasaheb.patil | Published: March 21, 2023 05:42 PM2023-03-21T17:42:33+5:302023-03-21T17:42:42+5:30
शहरातील कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सोलापूर - शहरातील कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात एकाच दिवसात १० रूग्ण आढळून आल्याची नोंद झाली आहे.
दरम्यान, शहरात सोमवारी ११९ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ४१ जणांची रॅपिड तर ७८ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यातील १०९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यातील रूग्ण हे भावनारूषी, दाराशा, मजरेवाडी, सोरेगाव या भागातील आहेत. १६ ते ३० वयोगटातील ५ तर ३१ ते ५० वयोगटातील ४ व ५१ ते ६० वयोगटातील १ रूग्णांचा समावेश आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे. आठ दिवसातील हा तिसरा मृत्यू आहे. लष्कर परिसरातील ३० वर्षाचे पुरूष हा पहाटे १.४५ वाजता उपचाराकरिता शासकीय रूग्णालयात दाखल झाला. तो उपचारा दरम्यान २० मार्च २०२३ रोजी सकाळी ९.४५ वाजता मयत झाला. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची नोंद आरोग्य विभागात झाली आहे.