नागरी वस्ती सुधारणातंर्गत सोलापूर जिल्ह्यात १० कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:22 PM2018-07-13T12:22:46+5:302018-07-13T12:28:24+5:30
सोलापूर जिल्हा प्रशासन : निविदा प्रक्रियेला झाली सुरुवात
सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८ नगरपालिका आणि २ नगरपंचायतींच्या क्षेत्रात १० कोटी ८१ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील बहुतांश कामांच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत नगरपालिकांच्या हद्दीतील दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामे केली जातात. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या कामांना मंजुरी देते. यंदाच्या वर्षी या कामांवरून राजकारणही पेटले होते. सोलापूर महापालिकेतील बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना लक्ष्य केले होते.
पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे या कामांना मंजुरी मिळण्यास उशीर लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मागील महिन्यात या समितीची बैठक झाली. या सोलापूर महानगरपालिकेसह १० नगरपालिका क्षेत्रातील कामांना मंजुरी दिली आहे. नगरपालिकांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार कामे मंजूर करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी सांगितले. सर्वाधिक ३ कोटी ५ लाख रुपयांचा निधी बार्शी नगरपालिकेसाठी मंजूर करण्यात आला आहे. यानंतर अक्कलकोट नगरपालिकेला १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील बहुतांश कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे पंकज जावळे यांनी सांगितले.
पालिकांची उदासीनता
- राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ऊर्जा बचतीसाठी एलईडी पथदिवे बसविण्याकरिता ईईएसएलसोबत करारनामा करावा, असे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने ४ जून रोजी दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सोलापूर महानगरपालिकेसह सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना यासंदर्भात आदेश दिले होते. परंतु, सोलापूर महानगरपालिका आणि बार्शी नगरपालिका वगळता इतर नगरपालिकांची या कामात उदासीनता असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
नगरपालिकानिहाय मिळालेला निधी
- बार्शी : ३ कोटी ५ लाख, पंढरपूर : ८४ लाख ११ हजार, अक्कलकोट : १ कोटी ३२ लाख, करमाळा : १ कोटी १७ लाख, कुर्डूवाडी : १ कोटी १९ लाख, सांगोला : ४९ लाख, मंगळवेढा : ९९ लाख, मोहोळ : ७३ लाख, माढा : ४९ लाख, माळशिरस : ४९ लाख.