आषाढीसाठी १० लाख भाविक पंढरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 06:28 AM2019-07-12T06:28:03+5:302019-07-12T06:28:15+5:30
वैष्णवांचा महासागर : संतांच्या पालख्यांसह सर्व दिंड्या दाखल
- प्रभू पुजारी।
पंढरपूर :
अनंत रूपाचे हे सार।
अनंत तीर्थांचे माहेर।।
अनंती अपार तो हा कटी।
कर ठेवुनी उभा।।
अनंत तीर्थांचे माहेर असलेल्या पंढरपुरात गेल्या अठ्ठावीस युगांपासून कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत असलेल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी संत-सज्जनांच्या पालख्यांसमवेत हरिनामाचा जागर करत १० लाखांची वैष्णवांची मांदियाळी गुरुवारी पंढरीत दाखल झाली असून चंद्रभागेच्या वाळवंटाला जणू वैष्णवांचा महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
१२ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने संतांच्या सर्व पालख्यांसह सर्व दिंड्या ११ रोजी रात्री पंढरीत दाखल झाल्याग़ुरुवारी दर्शन रांगेत ५० हजारांपेक्षा जास्त वारकरी होते़ ६५ एकर परिसरात ३ लाख ५० हजार, मठ, मंदिर, धर्मशाळा या ठिकाणी १ लाख, शहरातील मोकळ्या जागेत तंबू उभारून राहिलेले ३ लाख, चंद्रभागा वाळवंटात दीड लाख आणि रस्त्यावरून ये-जा करणारे १ लाख असे एकूण १० लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात आहे़
पंढरीत दाखल होताच भाविकांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळतात़ सध्या चंद्रभागा नदीपात्रात भरपूर पाणी आहे़ त्यामुळे पहाटेपासून भाविकांची चंद्रभागा वाळवंटी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी दाटी होताना दिसत आहे़
मराठा बांधवांतर्फे
मुख्यमंत्र्यांचा सत्कार
एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरला आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह इतर काही नेते या वेळी उपस्थित होते.
सत्कार करणारे लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यात लढा देणारे अनेक कार्यकर्ते सहभागी नाहीत, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे यांनी केला.