लोकसहभागातून १० हजार रुपये गोळा करणार; लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
By Appasaheb.patil | Published: August 30, 2022 04:59 PM2022-08-30T16:59:59+5:302022-08-30T17:00:05+5:30
गणेशोत्सव मंडळांच्या सुरक्षेसाठी सोलापूर तालुका पोलिसांचा पुढाकार
सोलापूर : गणेशोत्सव मंडळांच्या सुरक्षेसाठी मंडप व मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सोलापूर तालुका पोलिसांची आग्रही भूमिका आहे. ही भूमिका पूर्णत्वास नेण्यासाठी पोलीस लोकसहभागातून गावागावांतून १० हजार रुपये गोळा करणार असून त्या माध्यमातून गावातील प्रत्येक मंडळांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. येत्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या आगमनासाठी सोलापूरकर सज्ज झाले आहेत. मंडप उभारणी, गणेश मूर्तींचे रंगकाम, लेझीम सराव आदी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. याकाळात गणेशमूर्ती, प्रतिमेची विटंबना होऊ नये, जातीय वादाचे प्रसंग निर्माण होऊ नये, खंडणीसारखे गुन्हे दाखल होऊ नये यासाठी पोलिसांनी अगोदरपासून खबरदारी घेतली आहे. गावागावात शांतता कमिटीच्या बैठका घेऊन ग्रामस्थ व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना व नियम व अटी समजावून सांगण्यात आल्या आहेत.
----------
मंडळाची कार्यकर्त्यांची मंजुरी
शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांनी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, त्यासाठी लोकसहभागातून निधी उभा करावा असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत बैठकीमधील बहुतांश कार्यकर्त्यांनी एकमताने मंजुरी दिली.
--------
पोलिसांचे प्रयत्न सुरू
प्रत्येक गणेश मंडळासमोर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उभारणी करावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न असणार आहेत. लोकसहभागातून हे काम पूर्ण करण्यासाठी पोलीस पुढाकार घेणार आहेत. यासाठी काही उद्योजक, संस्था, संघटनांचीही मदत पोलीस घेणार असल्याचे सांगण्यात आले.
-------
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शांतता कमिटीच्या बैठकीतून मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थांना शासनाच्या नियम व अटीचे पालन करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. लोकसहभागातून गावागावांतील मंडळासमोर सीसीटीव्ही यंत्रणा उभा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
-नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस