सोलापूर महानगरपालिकेचे १०७५ कोटीचे अंदाजपत्रक सादर; कोणतीही करवाढ नाही
By Appasaheb.patil | Updated: February 20, 2023 15:14 IST2023-02-20T15:13:22+5:302023-02-20T15:14:05+5:30
सोलापूरकरांना दिलासा; मोठया प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकात विशेष तरतूद

सोलापूर महानगरपालिकेचे १०७५ कोटीचे अंदाजपत्रक सादर; कोणतीही करवाढ नाही
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांनी सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास १०७५ कोटीचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. या अंदाजपत्रकास मार्च महिन्यात अंतिम मंजूरी मिळणार असल्याचेही सांगण्यात आले.
सोलापूर महानगरपालिकेचे सन २०२३-२४ चे अंदाजपत्रक सोमवारी उपायुक्त तथा मुख्यलेखापाल विद्या पोळ यांनी आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मछिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
१०७५ कोटीचे हे जमा बाजूचे बजेट असून पालिकेला विविध बाबींपासून मिळणारं उत्पन्न ६७७ कोटी अपेक्षित आहे तर भांडवली कामासाठी ७० कोटी रूपये तरतूद करण्यात आली आहे. या बजेटमध्ये केंद्र आणि राज्याकडून ३२५ काेटी इतके अनुदान अपेक्षित धरले आहे. बजेटमध्ये सर्व प्रभागांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा यासाठी नियोजन केल्याचेही आयुक्तांनी सांगितले. याशिवाय शहरातील दोन उड्डाणपुल, अमृत योजना, पाणीपुरवठा, ड्रेनेज, निवडणुक खर्चासाठीचीही तरतूद करण्यात आली आहे.