दहावीच्या बोर्डाची उद्यापासून सोलापुरात परीक्षा; प्रत्येक वर्गात २५ विद्यार्थीच बसणार
By Appasaheb.patil | Published: March 1, 2023 11:56 AM2023-03-01T11:56:42+5:302023-03-01T11:57:33+5:30
दहावीचा पहिला पेपर २ मार्च रोजी होणार असून पहिला पेपर मराठीचा असणार आहे
सोलापूर - महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने उद्या २ मार्च २०२३ पासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ६४ हजार ४२४ विद्यार्थी बसणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात १७६ परीक्षा केंद्राची निर्मिती करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
दहावीचा पहिला पेपर २ मार्च रोजी होणार असून पहिला पेपर मराठीचा असणार आहे. जिल्ह्यात २० परीक्षा केंद्रे संवेदनशील असणार आहे. कॉफीमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. एकाच वर्गात सामुहिक कॉफीचा प्रकार निर्दशनास आल्यास संबंधित केंद्र संचालक व पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक तास व परीक्षेनंतर एक तास असे पाच तास केंद्रावर बैठे पथक असणार आहे.
सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षा सुरळीत सुरू असून कॉफीमुक्त अभियान राबविण्यात प्रशासन यशस्वी होत असल्याचे सांगण्यात आले. अनेक परीक्षार्थींनी परीक्षेला दांडी मारली आहे. ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावरही पोलिसांनी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. परीक्षेतून नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी काऊन्सेलर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना सवलत देण्यात आल्याचे सांगण्यात आले.