आर्थिक गर्तेतील सोलापूर जिल्हा बँकेला ११ कोटींचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 04:03 PM2020-07-11T16:03:08+5:302020-07-11T16:04:25+5:30
लवादाने दावा फेटाळला; व्यवस्थापन आता दिवाणी न्यायालयात जाणारं
सोलापूर : मोठ्या आर्थिक गर्तेतून सावरत असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला लवादाच्या निर्णयामुळे ११ कोटी ४ लाख रुपयांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे लवादाने कोअर बँकिंगचे काम करणाºया व्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनीचा दावा संपूर्णपणे मान्य करून बँकेचा दावा फेटाळला.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कोअर बँकिंगचे काम करण्यासाठी नागपूरच्या व्हर्च्युअल गॅलेक्सी इन्फोटेक या नामांकित कंपनीला २०१२ मध्ये पाच वर्षांसाठी दिले होते. त्याप्रमाणे त्या कंपनीने जिल्हा बँकेचे कोअर बँकिंगचे काम सुरु ठेवले. दरम्यान, बँकेने या कंपनीचे काम अचानक २०१७ मध्ये थांबवून दुसºया कंपनीला दिले. कराराप्रमाणे केलेल्या कामाची कंपनीची सुमारे ८ कोटी ३८ लाख ५ हजार ८८४ इतकी रक्कम देण्याची मागणी व्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनीने केली. मात्र बँकेने दिली नाही. रितसर नोटीस दिल्यानंतरही बँकेने दाद दिली नाही. त्यामुळे कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली.
उच्च न्यायालयाने यावर लवाद नेमण्याचा निर्णय दिला. न्यायालयाने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश माधव मकरे यांनी व्याजासह व्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनीला पैसे देण्याचा आदेश दिला. लवादाने आदेशात विविध प्रकारची ११ कोटी ३ लाख ८५ हजार १०५ रुपये इतकी रक्कम द्यावी असे म्हटले आहे. लवादाच्या निर्णयामुळे ही रक्कम बँकेला द्यावी लागणार आहे. व्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनीचे काम रद्द करणाºया जिल्हा बँकेने हेच कोअर बँकिंगचे काम दुसºया कंपनीला दिले होते. या कंपनीलाही बँक पैसे देत आहे. लवादाच्या निर्णयामुळे बँकेला दोन्ही कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. जिल्हा बँकेनेही व्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनी विरोधात (काऊंटर) दावा दाखल केला होता. लवादाने व्हर्च्युअल कंपनीचा दावा पूर्णपणे मान्य करीत असताना बँकेचा दावा मात्र फेटाळला आहे.
विमान भाड्याचीही रक्कम
लवादाच्या सुनावणीला एकवेळ जिल्हा बँकेचे कोणीही उपस्थित नव्हते. व्हर्च्युअल कंपनीने आम्ही सुनावणीला विमानाने येत असल्याने विमान भाड्याचे ३५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. लवादाने कंपनीची मूळ येणे रक्कम ८ कोटी ३८ लाख ५ हजार ८८४ रुपये, २४ मे २०१७ ते ७ एप्रिल २०१९ या कालावधीचे दोन कोटी ५७ लाख ४७१ रुपये व्याज, लवादाची फी ८ लाख ४३ हजार ७५१ रुपये व विमान भाडे ३५ हजार रुपये अशी एकुण ११ कोटी ३ लाख ८५ हजार १०५ रुपये इतकी रक्कम देण्याचे आदेशात नमूद केले आहे.
निर्णयाची प्रत मिळाली आहे. वाचल्यानंतर बारकावे समजतील. निर्णयाचा अभ्यास करुन सोलापूर जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात येईल. आमचा दावा फेटाळण्याचे कारण काय? , निकाल वाचल्यानंतर समजेल.
- शैलेश कोतमिरे,
प्रशासक, मध्यवर्ती बँक