११ लाखांचे उत्पन्न अपेक्षित; ५६ टन कांद्याच्या साठवणूकीसाठी १०० फुटांची उभारली चाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 03:47 PM2020-05-11T15:47:11+5:302020-05-11T16:03:20+5:30
शेटफळच्या तरुण शेतकºयाची किमया; लॉकडाऊनमधील वेळेचा केला सदुपयोग
करमाळा : तालुक्यातील शेटफळ येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर पोपट पाटील यांनी आपल्या शेतातील केळीच्या सव्वादोन एकर क्षेत्रामध्ये घेतलेल्या कांद्याच्या आंतरपिकापासून ५६ टन कांद्याचे उत्पादन घेतले आहे़ यापासून ११ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे़ सध्या लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग केला़ शिवाय आता कांदा विक्री केला तर अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतातील उपलब्ध साहित्यापासून कांदा चाळीची उभारणी करून तो साठवणूक करून ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी पदविकेचे शिक्षण झालेल्या ज्ञानेश्वरने शिक्षणानंतर नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला़ गावात कृषी सेवा केंद्र सुरू केले़ २०१३ पासून शेतीमध्ये मिळालेल्या अनुभवातून वेगवेगळी पिके घेत त्यामधून विक्रमी उत्पादन मिळवलेले आहे़ सध्या त्यांनी आपल्या सव्वादोन एकर क्षेत्रावर केळीचे पीक घेतले आहे़ केळी लागवड करण्यापूर्वी पूर्व मशागतीनंतर फेक पद्धतीने कांद्याची लागवड केली़ ठिबक संचाच्या साह्याने पाणी व्यवस्थापन केले़ लागवडीनंतर एक महिन्याने रासायनिक खताचा भेसळ डोस दिला़ वेळेवर खुरपणी करून कांद्याचे जोमदार पीक आणले़ यासाठी त्यांना ७३ हजार रुपये खर्च आला.
त्यांचा केळीमधील कांद्याचे आंतरपिकाचा प्रयोग या परिसरातील शेतकºयांना मार्गदर्शक ठरत असून अनेक शेतकरी त्यांच्याकडे येऊन यासंबंधी माहिती घेत आहेत.
कांद्यासाठी १०० फुटांची उभारली चाळ
- त्या क्षेत्रांमधून ५६ टन कांद्याचे उत्पादन मिळाले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने २५ टन कांदा चाळीच्या माध्यमातून साठवणुकीचा निर्णय घेतला़ स्वत:च्या शेतात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून १०० फुटाची कांदा चाळीची उभारणी केली आहे़ त्यांना या कांद्यापासून २० रुपये किलो दर अपेक्षित असून असा दर मिळाल्यास या आंतर पिकातून त्यांना ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे़