भोयरे येथे धाडीत ११ लाखांची वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:35 AM2020-12-14T04:35:26+5:302020-12-14T04:35:26+5:30
मोहोळ : भोयरे हद्दीत सीना नदीच्या काठावर बेकायदेशीरपणे साठा करून ठेवलेली १० लाख ८७ हजार रुपये किमतीची वाळू पकडण्यात ...
मोहोळ : भोयरे हद्दीत सीना नदीच्या काठावर बेकायदेशीरपणे साठा करून ठेवलेली १० लाख ८७ हजार रुपये किमतीची वाळू पकडण्यात मोहोळ पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार भोयरे हद्दीत सीना नदीच्या काठावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पोफळे, पोलीस नाईक ढावरे, शिपाई जाधव यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली. या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली असता नदीतील वाळू काढण्यासाठी वापरण्यात आलेली बकेट व दोरी मिळून आली. तसेच बाजूलाच साठा करून ठेवलेली वाळू आढळून आली. पोलिसांना पाहताच प्रवीण उर्फ पांडू गायकवाड हा आलेल्या वाहनातून (एम.एच. ४६, पी. १४८८) पळ काढला. पोलिसांनी त्या ठिकाणाहून साठा करून ठेवलेले वाळूचे दोन ढिगारे (१२० ब्रास) , वाळू उपसा करण्यासाठी आणलेली लोखंडी बकेट, ६०० फूट दोरी असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान समाधान खंदारे, दीपक झेंडगे, सागर पवार, तुकाराम खंदारे, किरण गायकवाड, सिद्दु खरात, हमू सिरसट, प्रवीण गायकवाड या आरोपींनीही तेथून पळ काढला. अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर करत आहेत.
---
फोटो: १३ भोयरे सँड
भोयरे हद्दीत सीना नदी काठावराल साठ्यावर मोहोळ पोलिसांनी धाड टाकून १२० ब्रास वाळूसाठा जप्त केला.