मोडनिंबचे ११ सदस्य अज्ञातस्थळी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:48 AM2021-02-05T06:48:30+5:302021-02-05T06:48:30+5:30
मोडनिंब ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ सदस्य राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी व माजी सरपंच बाबुराव सुर्वे यांच्या आघाडीचे ...
मोडनिंब ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ सदस्य राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी व माजी सरपंच बाबुराव सुर्वे यांच्या आघाडीचे विजयी झाले आहेत. मात्र, सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. तोडकरी व सुर्वे यांच्या पॅनलमधून दोन सर्वसाधारण महिला निवडून आल्या आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी बहुमत असतानाही कल्याणी तोडकरी, कैलास तोडकरी, शीतल मस्के, सदाशिव पाटोळे, जोशना गाडे, अमित कोळी, दत्तात्रय सुर्वे, सोमनाथ माळी, लक्ष्मी पाटील, मीना शिंदे, प्रमिला खडके हे सदस्य अज्ञातस्थळी रवाना केले आहेत.
विरोधी गटाचे सहा उमेदवार विजयी झाले असून लोकशाही आघाडीचे पाटील व गिड्डे गटाचे अरुण गिड्डे, प्रतापसिंह पाटील, सुनीता पाटील तर स्वाभिमानी विकास आघाडीचे शिवाजी सुर्वे गटाचे योगिता शिंदे व अमर ओहोळ, अपक्ष उमेदवार सीता सावंत या विजयी झाल्या आहेत. सध्या तरी विरोधकांकडे सत्ता स्थापनेसाठी संख्याबळ पुरेसे नाही. त्यामुळे मोडनिंब शहर विकास आघाडीमधील सर्व सर्वसाधारण महिला उमेदवार मीना शिंदे या दुसऱ्यांदा तर लक्ष्मी पाटील या पहिल्यांदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे या दोघींपैकी सरपंचपदांची माळ पहिल्यांदा कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वडील-मुलगी विजयी
या निवडणुकीत वेगवेगळ्या प्रभागांतून वडील व मुलगी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी हे ओबीसी असून ते सर्वसाधारण जागेवर निवडून आले आहेत, तर त्यांची कन्या कल्याणी तोडकरी ही ओबीसी जागेवर विजयी झाली आहे. ती २१ वर्षांची पदवीधर असून सध्या अर्थशास्त्र विषयामधून शिक्षण घेत आहे.