मोठी बातमी! सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार
By Appasaheb.patil | Published: December 19, 2022 07:24 PM2022-12-19T19:24:53+5:302022-12-19T19:25:40+5:30
सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.
सोलापूर: सोलापूर महापालिका स्थापनेनंतर प्रथमच नव्या भरती नियमावलीस राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अखेर मान्यता दिली आहे. यामुळे आता महापालिकेत ४६१२ मंजूर पदांपैकी १ हजार १२५ कर्मचारी, अधिकाऱ्यांची रिक्त पदभरती आणि पदोन्नतीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यानुसार आवश्यक असलेली महापालिकेत ‘पदोन्नतीसाठी कर्मचारी निवड समिती’ गठित करण्यात येणार आहे.
शासनाकडे प्रस्तावित असलेल्या ‘सोलापूर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवा वर्गीकरण) नियम २०२२’ या नियमावलीस नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. १५ डिसेंबर २०२२ रोजी तसे आदेश शासनाने काढले आहेत. सोलापूर महापालिकेत नवी भरती करताना महापालिकेचा आस्थापना खर्च महत्त्वाचा ठरणार आहे. शासन नियमानुसार नव्या भरतीसाठी सोलापूर महापालिकेला ३५ टक्क्यांपर्यंत आस्थापना खर्च मर्यादेची अट आहे. सध्या सोलापूर महापालिकेचा आस्थापना खर्च हा ४१ टक्के आहे. दरम्यान, तब्बल २५ टक्के रिक्त असलेली ही पदे भरतीसाठी शासनाच्या नव्या भरती नियमावलीच्या मान्यतेची प्रतीक्षा होती. शासनाकडे महापालिकेने पाठविलेला हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर १५ डिसेंबर रोजी शासनाने नव्या भरती नियमावलीस मान्यता दिली आहे. यासाठी यापूर्वीचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. यामुळे हा प्रलंबित भरतीचा व पदोन्नतीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
पदोन्नतीसाठी कर्मचारी निवड समितीची रचना अशी
भरती नियमावलीच्या मान्यतेनंतर आता सोलापूर महापालिकेत पदोन्नतीसाठी कर्मचारी निवड समिती गठित करणे आवश्यक आहे. त्याची रचना याप्रमाणे - अध्यक्ष - महापालिका आयुक्त किंवा पदनिर्देशित अन्य अधिकारी, सदस्य - मुख्य लेखा परीक्षक, संबंधित विभागाचे प्रमुख, आयुक्तांनी नामनिर्देशित केलेला मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी, निमंत्रक तथा सदस्य सचिव - उपायुक्त (सामान्य प्रशासन), अशी एकूण पाच जणांची ही निवड समिती राहणार आहे.
अशी आहे महापालिकेत वर्गनिहाय रिक्त पदांची संख्या
अ वर्गात ११२ पदे मंजूर असून, त्यापैकी ३५ पदे भरली आहेत, तर ७७ पदे रिक्त आहेत. ब वर्गातील २६३ पदे मंजूर असून, ८६ पदे भरण्यात आली. यामध्ये १७७ रिक्त पदांची संख्या आहे. क वर्गात १ हजार ३४२ पदे मंजूर आहेत, त्यापैकी ८०० पदे भरली असून, ५४७ पदे ही रिक्त आहेत. ड वर्गात २ हजार ८९५ पदे मंजूर करण्यात आली असून, २ हजार ५३० पदे भरली आहेत. ३१० पदे रिक्त आहेत, असे असे एकूण अ, ब, क, ड या चारही वर्गांतील १ हजार १२५ पदे रिक्त आहेत.