संततधारेचे ११७ कोटी मंजूर करेना; १८ हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:31 PM2023-03-10T12:31:02+5:302023-03-10T12:31:22+5:30

विमा कंपनीने नुकसान झालेल्या पिकांची तपासणी करून विम्यास पात्र केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांचे १४ कोटी ११ लाख ३७ हजार रुपये मंजूर असूनही खात्यावर जमा होत नाहीत.

117 crores of Santatdhar not sanctioned; The money of 18 thousand farmers got stuck | संततधारेचे ११७ कोटी मंजूर करेना; १८ हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले

संततधारेचे ११७ कोटी मंजूर करेना; १८ हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क 

सोलापूर : संपूर्ण खरीप पिके पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनी व राज्य सरकार आर्थिक मदत देण्यासाठी गॅसवर ठेवत आहे. पुढचा खरीप हंगाम तीन महिन्यांवर आला तरी मागील वर्षाचे पैसे मिळाले नाहीत. जिल्ह्यात पावसाच्या नुकसानीचे अहवाल शासनाने मंजूर केले नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मागील वर्ष फारच खडतर गेले. खरीप पेरणीसाठी खर्च केलेली पिके अतिवृष्टी व संततधारेने पाण्यात गेली. उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला. खरीप व रब्बी पदरात पडला नसल्याने विमा नुकसानभरपाई व शासनाकडून आर्थिक मदत तात्काळ मिळणे अपेक्षित होते. मात्र पुढचा हंगाम तीन महिन्यांवर आला तरी मागील वर्षाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.

विमा कंपनीने नुकसान झालेल्या पिकांची तपासणी करून विम्यास पात्र केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांचे १४ कोटी ११ लाख ३७ हजार रुपये मंजूर असूनही खात्यावर जमा होत नाहीत. याशिवाय नुकसानीच्या सूचनांपैकी विमा निश्चिती न केलेले ९,८३५ शेतकरी आहेत. असाच प्रकार पीक नुकसानीबाबत झाला आहे. नुकसान पिकांचे पंचनामे करून सहा महिन्याचा कालावधी उलटला तरी शासनाकडून पैसे जमा होत नाहीत.

एक लाख शेतकऱ्यांना ११२ कोटी

खरीप पीकविमा भरलेल्या एक लाख ९७ हजार ६६२ शेतकऱ्यांपैकी एक लाख ६३ हजार ९९० शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात जोखीम अंतर्गत पूर्वसूचना दिल्या होत्या. तपासणीत २३,८८१ शेतकरी अपात्र झाले, तर पूर्वसूचना दिलेले ५५६३ शेतकरी विमा कंपनीला कागदपत्रे देत नाही. पात्र झालेल्या एक लाख ४० हजार १०९ शेतकऱ्यांपैकी एक लाख १७ हजार ८९२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११२ कोटी ७३ लाख ७३ हजार रुपये जमा झाले आहेत. पूर्वसूचना दिलेल्या १९ हजार शेतकरी विमा नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

३६ कोटी कधी जमा होणार?
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या २६ हजार १४२ शेतकऱ्यांना २३ हजार ८६७ हेक्टरसाठी ३६ कोटी दोन लाख रुपये मंजूर आहेत. उत्तर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मंजूर करण्यात आले आहेत. मात्र ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.

* संततधार पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी मंद्रूप अपर तहसीलदार पाच कोटी, बार्शी तालुक्याचे १९ कोटी तसेच उत्तर सोलापूर, मंद्रूप अपर तहसील, माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा व सांगोला तालुक्यासाठी ९२ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला आहे. मात्र हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत.

त्या ३७ हजार शेतकऱ्यांचे काय?

खरीप हंगामातील पिकांसाठी एक लाख ९७ हजार ६६२ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यापैकी एक लाख ६३ हजार ९९० शेतकऱ्यांनी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना कृषी खाते व विमा कंपनीला दिली होती. पूर्वसूचना न दिलेल्या ३६ हजार ६७२ शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार की नाही, हे माहिती नाही.

Web Title: 117 crores of Santatdhar not sanctioned; The money of 18 thousand farmers got stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी