सोलापूर जिल्हा बँकेच्या ठेवीत ११८ कोटींची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:17 PM2018-04-05T14:17:52+5:302018-04-05T14:17:52+5:30
जिल्हा परिषद व नागरी बँकांनी काढलेल्या ६०० कोटींनंतर यावर्षी बँक सावरली
सोलापूर: जिल्हा परिषद व नागरी बँकांनी तब्बल ६०० कोटींच्या ठेवी काढल्याने ठेवीत मोठी घसरण झालेल्या सोलापूर जिल्हा बँकेत शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्यांच्या ठेवी यावर्षी ११८ कोटींनी वाढल्या आहेत. मात्र जिल्हा बँकेतून काढलेल्या ठेवीचा फटका जिल्हा परिषदेला सोसावा लागत आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला मागील चार-पाच वर्षे फारच अडचणीची होती. यावर्षी शासनाने केलेल्या कर्जमाफीमुळे बँकेला काहीअंशी आधार मिळाल्याने आर्थिक अडचणीतून बँक बाहेर पडू लागली आहे. सोलापूर जिल्हा बँकेचे नवीन शेतकºयांना १३-१४ पासूनच कर्ज वाटप बंद झाले. एकीकडे कारखानदार व शिक्षण संस्थांना दिलेल्या थकबाकीची आकडेवारी वाढत असताना दुसरीकडे शेतकºयांचे कर्ज वाटप थांबल्याने बँक अडचणीत आली.
यातच जिल्हा परिषदेने २०१४ नंतर टप्प्याटप्प्याने ३०० कोटींच्या ठेवी काढल्या. त्यानंतर नागरी बँकांनीही ३०० कोटींच्या ठेवी काढल्या. याचा परिणाम ठेवी कमी होण्यामध्ये झाला. ३१ मार्च १५ रोजी २८७८ कोटी ६८ लाख रुपये इतक्या असलेल्या ठेवी ३१ मार्च १६ रोजी २४७५ कोटींवर आल्या. मार्च १७ मध्ये तर त्या २२२५ कोटी इतक्या झाल्या. सातत्याने ठेवीची घसरण होत असल्याने बँक अडचणीत आली. मागील वर्षभरात नागरी बँका किंवा जिल्हा परिषदेने ठेवी न ठेवताही ३१ मार्च २०१८ रोजी ठेवीत मागील वर्षीच्या तुलनेत ११८ कोटींनी वाढ झाली आहे.
जिल्हा बँकेतील ठेवी काढून जिल्हा परिषदेने राष्टÑीय बँकांमध्ये ठेवल्या. यामुळे जिल्हा बँकेचे नुकसान झालेच शिवाय जिल्हा परिषदेलाही आर्थिक फटका बसतो आहे. राष्टÑीय बँकांपेक्षा किमान दोन टक्के जादा व्याजदर जिल्हा परिषदेला जिल्हा बँक देत होती. यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात दरवर्षी किमान ३ कोटींची भर पडत होती. जिल्हा परिषदेने ठेवी काढल्याचा फटका आता कसा कमी करणार? हा प्रश्न आहे.
जिल्हा परिषदेची मोठी रक्कम असल्याने त्यांच्यासाठी आम्ही विशेष व्याजदर देत होतो. आजही राष्टÑीय बँकांपेक्षा आमच्या बँकेत ठेवीसाठी सव्वादोन टक्के व्याजदर अधिक आहे. आमच्या बँकेतून काढलेल्या ठेवीमुळे जि.प.चे नुकसान होत आहे.
- राजन पाटील,
अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक